Tuesday, August 17, 2010

सुर्वे गेले त्या वेळची गोष्ट..

आता मुंबईत कापड गिरण्या नाहीत. गिरण कामगार नाही. गिरणगावच नाही. नारायण सुर्वेच्या आयुष्याला (आणि आत्म्याला!?) आशय आणि आकार देणारी मुंबई आता लयाला गेली आहे. तरीही सुर्वेची काव्यशिल्पे त्या इतिहासाची साक्ष देत राहणारच आहेत. इतिहासाच्या अवशेषातून इतिहास उभा राहतो आणि बदललेला वर्तमानही. गिरण्यांच्या दरवाजांवर, गिरण्यांच्या साच्यांवर, गिरण्यांच्या भोंग्यांवर, कामगारांच्या मोर्चात, त्यांच्या खानावळीत, त्यांच्या अंधाऱ्या चाळीत, त्यांच्या काळोखी आयुष्यातही चैतन्याची जी सळसळ होती ती सुव्र्याच्या कवितेतील शब्दा-शब्दांत आली, लयी-लयीतून प्रकट झाली आणि त्यांच्या काव्यगायनातून ती गिरणीच्या भोंग्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. तो भोंगा हेच त्यांच्या जीवनस्फूर्तीचे प्रतीक बनले. गिरणीची ती उंचच उंच चिमणी. त्यांच्या जीवनाचा दीपस्तंभ बनली. त्या गिरणीतच सुर्वेना कार्ल मार्क्‍स भेटला, गांधी दिसले, नेहरू आठवले- पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना माणूस दिसला. फक्त गिरणीतला वा मुंबईतला वा महाराष्ट्रातला नाही तर अवघ्या जगातला. म्हणूनच सुर्वेच्या कवितेला गिरणगावचे कुंपण सहज ओलांडता आले आणि त्यांच्या कवितेला वैश्विकता प्राप्त झाली. लौकिकार्थाने सुर्वेना ‘कवी’ म्हणायचे, की नाही असा प्रस्थापित सारस्वतांमध्ये एक वाद होता. तेव्हा मराठी साहित्यसृष्टीवर कलावादाचा प्रभाव होता. कवीचे जीवन, त्याचा परिसर, त्याच्या जीवनातील संघर्ष हे सर्व फिजुल आहे. कोणतीही कलाकृती ही स्वतंत्र, स्वायत्त, सार्वभौम असते आणि तिचा संदर्भ कवी वा लेखकाच्या जीवनाशी जोडणे हे हिणकस आहे, असे या साहित्य वर्तुळाचे ठाम मत होते. त्यामुळे सुर्वेच्या कविता त्यांच्या जीवनापासून विभक्त करून स्वत:च्या शब्दसौंदर्यावर उभ्या राहतात का, असा सवाल समीक्षकांपुढे होता. साधारणपणे १९५० ते १९६० चा तो काळ. ‘सत्यकथा’ने भारलेला. मुंबई-पुण्याच्या मुख्यत: मध्यमवर्गीय (ब्राह्मणी) जीवनाला वेढणारा. ‘दलित’ कवितेच्या त्या नावाने जन्मही व्हायच्या अगोदरचा तो काळ. तसे पाहिले तर शिवाजी पार्कचा परिसर ओलांडला, की लगेचच दादर पलीकडील गिरणगाव सुरू होत असे; पण त्या दोन-अडीच लाख गिरणी कामगारांत कुणी कवी वा लेखक असू शकेल, अशी शक्यताही त्या मध्यमवर्गीय साहित्य सहवासात नव्हती. याचा अर्थ ते सर्व लेखक-कवी असंवेदनशील होते, असे अजिबात नाही. त्यांच्यातील अनेक लेखक वा कवी माणसाच्या वेदनांचा आणि सुख-दु:खांचा नेमका वेधही घेत असत; परंतु कलावादी समीक्षेचे कुंपण स्वत:हून बांधलेल्या त्या सारस्वतांना कलाकार आणि त्याचे जीवन हे एकरूप झालेले असते, हे ‘साहित्याच्या मापदंडात’ बसविता येत नव्हते. त्यांच्या वेदनेच्या संवेदनेला त्यांच्या तत्त्वज्ञानाचेच काटेरी कुंपण होते. नारायण सुर्वेनी ते कुंपणच तोडायला सुरुवात केली.
‘एकाटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे
सावध असा, तुफानाची हीच सुरुवात आहे,
कामगार आहे, मी तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे
सुर्वेनी इशारा दिलेल्या मराठी साहित्यातील तुफानाला काही वर्षांतच सुरुवात झाली. तुफानात झंझावाती ताकद असते. त्यात चांगले-वाईट सगळेच उन्मळून टाकायची विलक्षण शक्ती असते. तुफानाचे सौंदर्य आणि सामथ्र्य त्यातच आहे. काहीसे तसेच झाले. साठीच्या दशकात आलेले ते तुफान कधी नवनिर्मितीची लाट घेऊन आले तर कधी बेदरकारपणे अराजकी बनले. एक मात्र नक्की. त्या साठीच्या व नंतर सत्तरीच्या दशकाने मराठी साहित्याचे परिमाणच बदलून टाकले. मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा परिसर बदलून टाकला. जुन्या साहित्यातील अलंकारांबरोबरच नवसाहित्यातील ‘आकृतीबंध’ही उधळले गेले. महाराष्ट्रातील दलितांनाच नव्हे तर भटक्या-विमुक्तांनाही आता सारस्वतांचे प्रांगण खुले झाले होते. श्री. म. माटय़ांनाही न दिसलेले, पण भावलेले, उपेक्षितांचे सर्व अंतरंग फसफसून आणि रसरसून साहित्यात आले. (सत्तरीच्या अखेरीस ‘सत्यकथा’ बंद झाला हा योगायोग नव्हता- सुर्वेनी भाकीत केलेल्या तुफानाचा तो परिणाम होता.) आई-बाप कोण माहीत नाही, कुणी आपल्याला ‘बेवारशी’ टाकले याचा शेवटपर्यंत पत्ता नाही. जन्मतारीख नाही, नाव नाही- गाव नाही, काय करायचं माहीत नाही आणि जीवनाला काही अर्थ वा हेतू असतो याची सुतराम कल्पना नाही, अशा या ‘नारायणा’ला ज्यांनी सांभाळले त्यातून नारायण सुर्वे नावाचा शहरी ‘कामगार’ जन्माला आला. ‘बालमजूर’ ही संज्ञाही वापरली जाण्यापूर्वी कुठेही चार-दोन रुपयांवर मजुरी करणारा नारायण ‘कामगार’ झाला. सुर्वेना ‘मजूर’ हा शब्द आवडत नसे. मजुरीत गुलामी व लाचारी असते, पण ‘कामगार’ असण्यात अभिमान आणि संघर्षांचे तेज असते ते म्हणत. तसे अभिमान व तेज ज्या काळात ‘कामगारवर्गाला’ होते त्या काळात सुर्वेनी हातात लाल बावटा घेतला. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि कम्युनिस्टांची गिरणी कामगार युनियन ही सुर्वेची स्फूर्ती देवते झाली. त्यातूनच सुर्वेनी त्यांचे समांतर विद्यापीठ निर्माण केले. सुर्वेच्या विद्यापीठात तयार झालेल्या हजारो लेखक-कवी-नाटककारांना पदव्या नाहीत, डॉक्टरेट नाहीत, प्राध्यापकी नोकऱ्या नाहीत वा समीक्षकाचे ‘स्टेटस’ नाही; परंतु त्या विद्यापीठात (खरे म्हणजे तालमीत!) तयार झालेले कवी वा कलाकार आज जगभर आपल्या कलाकृती सादर करू शकले आहेत. त्यात नामदेव ढसाळ, दया पवार वा लक्ष्मण मानेच नव्हेत तर चित्रकार सुधीर पटवर्धन वा चित्रपटकार अरूण खोपकरही आहेत. सुर्वेचे विद्यापीठ मुंबईच्या उजाड, बकाल, विषण्ण आणि तरीही जीवनरस न आटलेल्या रस्त्यांवर होते. ‘बूट पॉलिश’ वा ‘शहर और सपना’ या चित्रपटांसारखे. के. ए. अब्बास यांचेही विद्यापीठ तेच होते आणि राज कपूरला मुंबई ते मॉस्को नेणाऱ्या चित्रपटकारांचेही
‘ना घर होते, ना गणगोत,
चालेन तेवढी पायाखालची जमीन होती,
दुकानांचे आडोसे होते; मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती
..मोजलेत सर्व खांब या रस्त्यांचे,
वाचली पाटय़ांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत,
हातचे राखून कित्येक मारलेले गडी’
‘माझे विद्यापीठमधील जीवनाचा दाह हाच सुर्वेचा प्राथमिक शिक्षक होता. पुढे रीतसर कामगार होऊन प्रथम युनियनचे आणि नंतर कम्युनिस्ट पक्षाचे काम सुरू झाल्यावर त्या ‘उच्च शिक्षणा’च्या काळात सुर्वेना कार्ल मार्क्‍स भेटला आणि त्याबरोबर त्यांचे जीवनच उजळून निघाले.
‘माझ्या पहिल्या संपातच
मार्क्‍स मला असा भेटला,
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता’
मार्क्‍सने सुर्वेना ‘ओळखले!’ आणि त्या कामगार वेषातील नारायणाला मार्क्‍स म्हणाला,
‘अरे, कविता-बिविता लिहितोस की काय?
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा’
मार्क्‍सच्या या रसिकतेचे भान व ज्ञान प्रस्थापित सारस्वतांना नव्हते; पण सुर्वेनी थेट त्यालाच साहित्य प्रांतात आणल्यावर पुन्हा एकदा ‘कलेसाठी कला’, की ‘समाजासाठी कला’ हा बाष्कळ वाद ऐरणीवर आला. सुर्वे तथाकथित वाद व समीक्षेपासून चार नाही तर चारशे हात दूर होते. असे असूनही सुर्वे ‘पोथीनिष्ठ’ कधीही झाले नाहीत. त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, ‘उद्या पोथीनिष्ठ मार्क्‍सवाद्यांकडून माणूस आणि कलेच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तर माणसाच्या व कलेच्या सच्च्या स्वातंत्र्याचा पक्ष असेल तोच माझा राहील नाहीतरी मार्क्‍सनेच म्हटले आहे, की रोज जो गंज चढेल तो घासून काढा व पुढे चला. कारण गंज चढलेल्या तलवारीने (तत्त्वज्ञानाने) विजय मिळविता येणार नाही.’ सुर्वेना मार्क्‍स भेटला तो असा. विद्यापीठ सापडले ते असे. कामगार समजला तो असा आणि त्यांच्या साहित्याला जागतिक परिमाण मिळाले ते असे. ‘शृंखलांव्यतिरिक्त गमाविण्यासारखे आपल्याकडे काही नाही’ असे सांगणाऱ्या मार्क्‍सच्या सुर्वे नावाच्या वारकऱ्याकडेही गमाविण्यासारखे काहीही नव्हते. त्याच लाल अवकाशात आता त्यांचे चैतन्य मिसळून गेले आहे!