Saturday, February 14, 2009

पृथ्वीच्या जैविक पसाऱ्याचे सूत्र


१२ फेब्रुवारी २००९ ही चार्ल्स डार्विनची २०० वी जयंती. यंदा त्याच्या उत्क्रांतीवादाला १५० वर्षे होत आहे. आधुनिक विज्ञानाचा तो पाया असला तरी सिद्धांत मांडण्यात आला तेव्हा तो अमान्यच झाला. त्याचे महत्त्व पटायला विद्वान माणसाच्या अनेक पिढय़ा जाव्या लागल्या..
या वर्षी म्हणजे २००९ साली गॅलिलिओप्रणीत खगोल विचारांना ४०० वर्षे पूर्ण झाली. याच वर्षांमध्ये डार्विनची २०० वी जयंती आहे आणि ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’ या त्याच्या


क्रांतिकारक सिद्धांताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. गॅलिलिओच्या सिद्धांताने माजलेली खळबळ आता ओसरली आहे. चर्चच्या धर्म मरतडांनी गॅलिलिओला मरणोत्तर माफीसुद्धा जाहीर केली आहे. पण तितकाच व्यापक आणि क्रांतिकारक असलेल्या डार्विनला हे भाग्य अजून लाभायचे आहे.
‘उत्क्रांती’ ही कल्पना इरास्युख डार्विन यांनी म्हणजे चार्ल्स डार्विनच्या आजोबांनी सुचविली होती. नंतर ज्यो बाप्तिस्ता जाँ हमारने तिचा पाठपुरावा केला. डार्विनचे काही समकालीनदेखील या कल्पनेच्या उभारणीत होते. परंतु त्या कल्पनेला आधारभूत असा कार्यकारणभाव व त्यातले इंगित त्यांना गवसले नव्हते. अफाट निरीक्षणे, पुरावे, माहिती याच्या जंजाळात तर्कसंगती शोधताना चार्ल्स डार्विनला ‘निसर्गाचा वेचकपणा’ किंवा ‘निवडीचे सूत्र’ गवसले. ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’मुळे धर्ममरतड बिथरले. तो संताप अजून विरलेला नाही. तो अजूनही निर्मिकवाद (क्रिएशनिझम) विरुद्ध बुद्धीपुरस्सर योजनावाद (इंटेलिजंट डिझाइन) असा खदखदतोच आहे.
पण यापेक्षा अधिक पोषक उत्पात जीवशास्त्रात झाला. जीवशास्त्रज्ञ मोठय़ा चिकाटीने जीवाश्म, जीवांचे नमुने गोळा करीत होते. ते पारखून त्यांची वर्गवारी करीत होते. पण सर्वाच्या मुळाशी काही साधम्र्य आहे, त्यांच्यातली विविधताही काही सांगते का, हे त्यांना शोधावेच लागले. ही विविधता कशी उपजली? कशामुळे? त्याला काही सूत्र आहे का? जीव उपजले, कोणी तगले, कोणी निमाले, असे कशाने होते? परिस्थितीशी जुळवून घेणारे (अनुकूलन साधणारे) तगतात. त्यांच्याच वर्गातला वंश बघायला मिळतो. (निसर्गाची निवड) अशी काही विशिष्ट यंत्रणा असते का? अशा प्रश्नाशी भिडता भिडता जीवशास्त्रीय माहितीला, तथ्यांना, विचारांना एक चौकट आवश्यक वाटली. चार्ल्स डार्विनने त्यांचा वेध घेताना इतके पुरावे आणि निसर्गातल्या साक्षी समोर ठेवल्या की त्यामुळे ‘उत्क्रांती’ ही अटकळवजा कल्पना राहिली नाही.
दिवसागणिक पुराजीवी व सूक्ष्म जीवशास्त्राला इतके पुरावे व दाखले लाभत गेले की, त्याचे ठाशीव सिद्धांत बनले. आजघडीला असलेल्या उत्क्रांतीशास्त्राची पायाभरणी डार्विनने केली. त्यातली सगळी दालने त्याने उघडली, असे नव्हे. आज उपलब्ध असलेले अनुवंशशास्त्र, संख्याशास्त्र, जनुकशास्त्र आणि त्यांच्या प्रष्टद्धr(२२४)नांचा छडा लावण्याच्या रीती तेव्हा नव्हत्या. मेंडेलचे अनुवंश व जनुकविषयक प्रतिपादन प्रकाशित झाले तेव्हा ‘उत्क्रांती’ कल्पनेचा अवतार संपला, असे बहुतेक लोक मानू लागले होते. पण फिशर, हाल्डेन प्रभृतींच्या संशोधन व विचारातून उलटेच झाले. उत्क्रांतीशास्त्र अधिक बळकट आणि व्यापक झाले.
संशोधनाची उपकरणे आणि सीमारेषा सुधारत गेल्या, तसे या सिद्धांताचे रूप अधिक समावेशक बनू लागले. हा शास्त्रविचार एककलमी गुरुकिल्लीवाद नाही. जीवसृष्टीच्या घडामोडींचा उलगडा परस्परबद्ध पण भिन्न सूत्रांनी केला जातो. नैसर्गिक निवड, उत्परिवर्तन (म्यूटेशन), अनुवंशता, अनुकूलन, अनिश्चितता आणि संभाव्यता अशा निरनिराळ्या प्रेरणांची एकवट कालौघात कशी प्रकटते याचा शोध घेणारी ही प्रणाली आहे.
जीव रसायने, बिजाणूशास्त्र, नॅनोतंत्र यांच्या संकराने जीवशास्त्राची छबी झपाटय़ाने पालटते आहे. जीवाबद्दलचे आकलन जैवतंत्रातल्या सुधारणांमुळे अधिक धारदार बनत चालले आहे. याला चालना उत्क्रांतीशास्त्रामुळेच मिळाली.
जीवांमधील संघर्ष सहज आहे. उत्क्रांती आणि परिसर, पर्यावरण यांचा कसा कसा संबंध येतो? अशा कितीतरी विभिन्न प्रश्नांनी प्रेरित केलेल्या नव्या शाखा उदयाला आल्या आहेत. औषधविज्ञानापासून मनोविज्ञानापर्यंत उत्क्रांतीशास्त्राची छाया पसरली आहे. उत्क्रांतीशास्त्र हे सगळ्या जैविक पसाऱ्याला एका परिघात आणणारी प्रणाली आहे. परंतु या व्यापक सिद्धांताची अजूनही समाजमानसात घडी बसलेली नाही. भल्याभल्या सुशिक्षितांच्या याबाबतच्या धारणा अगदी विपरित आहेत. ‘उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस बनला,’ ‘उत्क्रांती म्हणजे आपल्या दशावतार कथा’, ‘उत्क्रांती म्हणजे बळी तो कान पिळी’, ‘उत्क्रांती म्हणजे स्वार्थीपणे जगण्याचे तत्त्वज्ञान’ अशा अनेक बालीश अडाणी धारणांचा जबर पगडा आजही आहे. ‘निसर्गातील विविधता, चक्रावून टाकणारी यंत्रणा व सामग्री ही कुण्या अद्भूतकर्त्यांची नक्षीदार बुद्धीपुरस्सर करामत आहे’, ही श्रद्धा सहजी सुटत नाही. त्याला छेडणारे कुठले प्रतिपादन सहजी गळी उतरत नाही, त्याचा हा परिणाम असावा!
त्यातच या शास्त्राच्या वाटचालीत आणखी काही किटाळ त्याच्या वाटय़ाला आले. ‘सुप्रजनन शास्त्र’ म्हणजे हेतुपुरस्सर शेलक्या गुणधर्मीयांचा संकर घडवणे व त्यातून महाबळी, आदर्श जीव तयार करणे, ही कल्पना एकेकाळी लोकांच्या मनात अशी रुजली की ती सहजी पुसली जात नव्हती. अमेरिकेपासून कम्युनिस्ट रशियापर्यंत सर्वत्र हे वेड होते. ‘सुप्रजनन शास्त्रा’ची उत्क्रांती शाखेशी असणारी गणिती जवळीक आणि वेडगळ वंशश्रेष्ठत्व कल्पना यामुळे हे किटाळ उत्क्रांतीशास्त्रांतील कल्पनांवर उडाले. समाजशास्त्रामध्येही बळी तो कान पिळीसारखी सूत्रे लावून प्रतिपादन करणारे शास्त्रज्ञ उपजले.
वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. उत्क्रांतीशास्त्र उमगले तर वंशश्रेष्ठत्व, वर्णश्रेष्ठत्व, नैसर्गिक उच्चनीचता या कल्पनांना बाधा येते; पुष्टी मिळत नाही. चार्ल्स डार्विनचे काही बुजुर्ग चरित्रकार उत्क्रांतीच्या विचारामागे डार्विनचा गुलामगिरीला असलेला कडवा विरोध ही प्रेरणा होती, असे नमूद करतात. पण हे लक्षात कोण घेतो? काही तथाकथित विचारवंत रशियातील पडझडीनंतर ‘मार्क्‍स हरला डार्विन जिंकला’ असे अजागळ नारेवजा लेख लिहित होते!
दुर्दैवाने जीवशास्त्राला व्यापारी झळाळी नाही. आणि त्याचा बौद्धिक दरारा, दबदबा नाही. एकविसाव्या शतकामध्ये जैवतंत्रज्ञानाची चलती येणार असल्याने कदाचित ही अवस्था पालटेलही. पण या शाखांच्या प्रवेश खिडकीपाशी अजून विद्यार्थ्यांची रांग दिसत नाही. प्रयोगशाळा सहायक बनविण्याची कुवत असलेल्या बायोटेक्नॉलॉजीला मात्र तुरळक गर्दी लाभू लागली आहे. परिणामी या शाखांत व या शाखांना गोवणाऱ्या उत्क्रांती शास्त्राबद्दल अनास्था असल्यास नवल नाही.
सूक्ष्मजीव आणि विचार, त्यामुळे होणारे आजार, औषधे आणि औषधांना धाब्यावर बसवणारी जीवाणू विषाणूंची प्रतिकारशक्ती हा आटय़ापाटय़ा वैध शास्त्रातील लोक नित्याने अनुभवतात. पण याचा उत्क्रांतीशी काही संबंध आहे, अशी शंकादेखील त्यांना चाटूनदेखील जात नाही. उच्चविद्याविभूषितांची ही तऱ्हा तर सामान्यांची काय कथा? या क्रांतीकारक ग्रंथाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ही अनास्था दूर करत प्रबोधन करण्याचा शाळा, महाविद्यालये प्रयत्न करतील, अशी आशा करू या!

Thursday, February 12, 2009

व्हॅलेन्टाइन डे

ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे.

स्त्री व पुरुष किंवा तरुण-तरुणी यांना परस्परांविषयी प्रेमभावना निर्माण होणे, ही वास्तविक निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे- जी माणूस टाळू शकत नाही. कारण तो निसर्गाच्या प्रभावाखालीच असतो. या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होणे हे जितके गैर आहे, तितकेच ती संयमाने व्यक्त करण्याचे मार्ग बंद करून एकूणच ती भावना दडपणे, हे त्याहून गैर आहे. "व्हॅलेंटाइन डे'ला मुला-मुलींनी एकमेकांना फूल वा भेटवस्तू देऊन मनातील मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा हा मार्ग निश्‍चितच सभ्य आणि उच्च अभिरुचिदर्शक आहे. अगदी होळीला तरुण-तरुणींनी एकमेकांच्या अंगाला रंग फासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य आहे. ज्या वयामध्ये एकमेकांविषयीच्या आकर्षणाची निसर्गतः सुरवात होते, त्या वयाच्या तरुण मंडळींची ही प्राथमिक गरज आहे. म्हणून तरुण मुलामुलींना हा साधा आनंद घेऊ द्यावा. जर दहशतीने, हिंसेने या भावनेचे प्रकटीकरण आपण बंद पाडू लागलो तर दुसऱ्या मार्गाने चोरून, नजर चुकवीत तरुण मंडळी हे प्रयत्न करीत राहतील. मग ते नैतिक आहे का? पुण्या-मुंबईसारख्या शहरात, जिथे पालक नोकरीमुळे जास्त व्यस्त आहेत तिथे "सहलीला जातो सांगून एक दिवस एक रूम शेअर करून राहणे' असे मार्ग काही जण अवलंबितात. "व्हॅलेंटाइन डे'सुद्धा जर त्यांच्यापासून हिरावून घेतला, तर मग "रूम शेअर' करणे हाच पर्याय तरुणांसमोर राहील आणि ती संख्या वाढीस लागेल. खरे तर मनात असणाऱ्या राग व प्रेम या उद्रेकी भावनांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने निचरा होण्यानेच माणसाची त्या विकारातून मुक्तता होत असते आणि मनःस्वास्थ्य स्थिर राहते. मग असे मानसिक "फिटनेस आणि हेल्थ' जपणारे योग्य व सौम्य मार्ग संस्कृतीच्या सवंग किंवा चुकीच्या कल्पनांनी का बरं रोखून धरायचे? त्यापेक्षा "व्हॅलेंटाइन डे'चे मूळ स्वरूप तसेच ठेवून,

त्याला "भारतीय टच' दिला तर? ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे. असा तो दिवस आपण भारतीय करून घ्यावा. "व्हॅलेंटाइन डे'ला विरोध असणाऱ्यांनी तो दिवस बंद करण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करावा.

-मंगला सामंत, पुणे

प्रेमाचा उगम मेंदूत, ह्रदयात नव्हे


व्हॅलंटाइन डे साजरा होत असताना, येथील डॉक्टरांनी प्रेमिकांना धक्का दिला आहे. प्रेमाचा आणि ह्रदयाचे जवळचे नाते आहे अशी लोकांची कित्येक शतके समजूत आहे. यालाच धरून गाणी रचली गेली, कथा आणि कादंबऱ्या लिहील्या गेल्या. हार्ट अॅटॅक येण्याशीही काही अतिउत्साही मंडळींनी संबंध जोडला. मेरे दिलके टुकडे हजार हुए, इक इधर गिरा, एक उधर गिरा असेही म्हटले गेले. गुलाबी रंगाचे ह्रदय ही तर प्रेमाची, व्हॅलेंटाइन डेची निशाणी ठरली.

पण आता हे सारे बदलावे लागेल. कारण येथील डॉक्टरांनी पाहणीअंती निष्कर्ष काढला आहे की प्रेम हे मेंदूत उगम पावते. ह्रदयात नव्हे. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनीच हे म्हणणे मांडल्यामुळे त्याचा प्रतिवाद करणेही सोपे नाही. याची प्राथमिक पाहणी उंदरांवर केली गेली. त्या आधारे माणसाच्या मेंदूत प्रेमविषयक भावना कशा असतात याची कल्पना त्यांना आली.

माणसाच्या मेंदूत चार अतिसुक्ष्म भाग आहेत, जेथे प्रेमाचे सकीर्ट सुरू होते. यापैकी व्हेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणजे व्हॅट हा या सकीर्टचा केंदबिंदू आहे. याचा आकार डोळयातील आसवासारखा असतो. नुकत्याच प्रेमात पडलेल्यांना त्यांच्या साथीदाराचे छायाचित्र दाखवले तेव्हा या भागात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून डॉक्टरांनी हा निष्कर्ष काढला आहे. अर्थात दोन दशकांनंतरही एकमेकावर उत्कट प्रेम करणाऱ्यांचाही व्हॅट हाच भाग महत्त्वाचा आहे असे आढळले.

व्हॅटमध्ये तयार होणारे डोपेमिन हे दव्य मेंदूच्या विविध भागांत धाडले जाते. जेव्हा तुम्ही कोणाला पटवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हे दव्य तयार होण्याची आणि ते पाठवण्याची गती वाढते. हे सारे व्यवस्थित घडत असते तेव्हा प्रेम यशस्वी होते, त्यात बिघाड झाला की माणसाच्या हातून काहीतरी भयानक घडण्याचा धोका असतो.

यामुळेच ज्यांचा प्रेमभंग झाला आहे अशांचाही डॉक्टरांनी अभ्यास केला. तेव्हा मेंदूच्या न्यूक्लीअस अॅकमबेन्स या भागातील हालचाली वाढतात असे आढळून आले आहे.मग ते वेडेपिसे होतात. अगदी मादक दव्याचे व्यसन लागलेल्यांना ते न मिळाल्याने नेमके जे होते तेच या प्रेमभंग झालेल्यांबाबत घडते.

यापुढे प्रेमाचे प्रतिक मेंदू दाखवले जाईल की ह्रदयाची जागा कायम राहील? काही असो, उद्या व्हॅलंटाइन डे साजरा करताना ह्रदयावर हात ठेवून प्रेमाच्या आणाभाका घ्या!

Wednesday, February 11, 2009

गांधीजींना भेटलेले तुकाराम!

अमेरिकन अध्यक्षांच्या जुन्या ऑफिसात गांधीजींचा फोटो होता. तो आताही असेल, तर माहित नाही. पण तर त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचे सांगतात. इसायलच्या दहशतवादाला दहशतवादाने उत्तर देऊन थकलेले पॅलेस्टीनचे लोक मुबारक अवाद यांच्या नेतृत्वात गांधीवादाची कास धरण्याची हिंमत करतात. ब्रिटिश लोक त्यांचा लाडका फुटबॉलपटू गॅरी लिनेकरचा पुतळा उभारण्याची मागणी करत आहेत. पण तो मात्र तिथल्या भारतीयांच्या सुरात सूर मिसळून म्हणतोय , गांधीजींचा पुतळा उभारा. दलाई लामा असोत की आँग सान स्यू की , सतत पराभव दिसत असूनही अहिंसेच्या मार्गावरचा त्यांचा विश्वास कणभरही कमी झालेला नाही. गेल्या दोनेक महिन्यांतल्याच या बातम्या आहेत. महात्मा गांधींच्या हत्येला पन्नासहून अधिक वर्षे झाली. पण त्यांचा जगभरातला प्रभाव कमी होत नाही. वाढतोच आहे.

पण गांधीजींवर कोणाचा प्रभाव होता ? गांधीजींनी सत्याचे प्रयोग करताना स्वत:ला मोहन ते महात्मा असे विकसित केले. त्यात ' आनौ भद: ' म्हणत गौतम बुद्धांपासून लिओ टॉलस्टॉयपर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टींचे संस्कार स्वत:वर करून घेतले. त्यात एक संस्कार मराठी मातीतलाही होता. आपल्याला फारसा माहित नसलेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचारांचा संस्कार.

गांधीजींनी तुकोबारायांचे संस्कार कसे पचवले याचा साक्षीदार आहे , गांधीजींनी तुकारामांच्या सोळा अभंगांचा इंग्रजीत केलेला अनुवाद. त्यांनी हा अनुवाद ' आश्रम भजनावली ' साठी केला होता. या भाषांतरात साहेबाच्या भाषेचा , त्या भाषेच्या विदेशी पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा येत नाही आणि तुकोबांचे विचार थेट जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहोचतात. लेखक आणि अनुवादकामधले असे अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळते. दोन सच्च्या वैष्णवांमधले हे अद्वैत. विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलेय. त्यांना जिवे मारण्याच्या यशस्वी अयशस्वी योजना जिथे आखल्या गेल्या , त्या पुण्यातल्या येरवडा तुरुंगात बंदी असताना त्यांनी हे लिहिलेय.

तुकारामांच्या हजारो अभंगांमधून गांधीजींनी अनुवादासाठी अवघ्या सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे. मुळात त्यांनी आश्रम भजनावलीत देशभरातल्या विविध संतांच्या रचना एकत्र केल्या आहेत. त्यातून गांधीवाद उभा केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले वाटतील असेच अभंग यात निवडले आहेत. पण मुळात त्यांना मराठी येत होते का , हा प्रश्न येतोच. डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी ' तुकाराम गाथे ' चे हिंदी भाषांतर केले होते. गांधीजींनी त्याला छोटी प्रस्तावना लिहिली आहे. ' मला फारसं मराठी येत नाही , तरी तुकाराम मला खूप प्रिय आहेत ', असे त्यात आवर्जून लिहिले आहे. मराठी अभंगांचे अर्थ समजून घेताना त्यांना अनेकांची मदत झाली असावी. महादेवभाई देसाई , स्वामी आनंद , काका कालेलकर , विनोबा , किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सावल्यांना मराठी उत्तम येत होते. त्यातले काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यात त्यांच्या सोबतही होते. त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील. पण या हृदयीचे त्या हृदयी पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवे असते ते अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होते.

महाराष्ट्र आणि गुजरातेतली सांस्कृतिक देवाणघेवाण अनेक शतकांची आहे. तुकाराम गांधीजींपर्यंत पोहोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी सातशे वर्षांपूवीर् भागवत विचारांची ध्वजा आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचवली होती. त्यांचे बराच काळ गुजरातेत वास्तव्य होते. त्यांनी गुजरातीत अभंगरचनाही केली आहे. त्याचा प्रभाव नरसी मेहतांसहित सर्व वैष्णव संतांवर स्पष्ट दिसून येतो. आणि नरसींचा प्रभाव पारंपरिक वैष्णव संस्कारांत वाढलेल्या गांधीजींवर होता. म्हणूनच तर नरसींच्या ' वैष्णव जन तो... ' याच्याशी अपार साम्य असलेल्या ' जे का रंजले गांजले... ' चा अनुवाद गांधीजी आवर्जून करतात.

' पापांची वासना नको दांवू डोळा... ' चे त्यांनी केलेले भाषांतर वाचताना गांधीजींना या अभंगात त्यांची तीन माकडे दिसली असतील असे वाटते. तेव्हा त्यांच्या अजेंड्यावर वरचे स्थान असणाऱ्या अस्पृश्यता निवारणाशी थेट भिडणारा ' महाराच्या सिवे , कोपे ब्राम्हण तो नव्हे ' हा अभंगही येथे आहे. वारकरी संप्रदायातील सर्व जातींचा संतमेळ्याचे वर्णन ' पवित्र ते कूळ... ' या अभंगात आहे. तशीच समाजातील सर्व घटकांमधील जागृती स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींना अपेक्षित होती , असे त्याचा अनुवाद वाचताना वाटते. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती... ' आणि ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती... ' हे प्रसिद्ध अभंग यात आहेतच. पण मोक्षालाही नाकारण्याची हिंमत दाखविणाऱ्या तुकोबांच्या रोकड्या तत्त्वज्ञानालाही येथे जागा आहे. तसेच भगवद्भक्ती आणि नाममहात्म्याचे महत्त्व सांगणाऱ्या अभंगांनाही. ' हेचि दान देगा देवा... ' आणि ' शेवटची विनवणी... ' या चटका लावणाऱ्या अभंगांनाही मानाचे स्थान दिले आहे.

पण फक्त हे अभंगच नाहीत , तर गांधीजींवरचा तुकारामांचा प्रभाव सिद्ध करणारे इतरही अनेक दाखले आहेत. त्यांच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांचा उल्लेख अनेकदा आलाय. त्यांचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात ' तुका ' असा इंग्रजी सर्च दिला की अनेक संदर्भ समोर येतात. एका ठिकाणी महाराष्ट्राचे वर्णन करताना ते म्हणतात , ' जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला , आधुनिक युगाचे नायक असलेल्या शिवाजी महाराजांची जी भूमी आहे , जिथे तुकारामांनी आपले कार्य केले , ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे. ' आणखी एक महत्त्वाचा संदर्भ वाईच्या एका भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांच्या ' कठीण वज्रास भेदू ऐसे ' अशा तत्त्वज्ञानाचा दाखला दिला आहे.

पुढे दलितांच्या सभेतील एका भाषणाचा संदर्भ येतो. त्यात हिंदूधर्माचे मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर- तुकारामांचा धर्म चिरकाल टिकणार असल्याचे सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेकडे ओढल्या जाणाऱ्या दलितांनी हिंदू धर्म सोडू नये , अशी गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचा संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात तामिळ संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असे अधोरेखित केले आहे. एका पत्रात ते लिहितात , ' तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का ?... गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामांसारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. '

गांधीजींचे सुहृद गुरुदेव रवींदनाथ टागोरांनाही तुकारामाने मोहिनी घातली होती. ब्राह्मो समाजामुळे टागोरांचा महाराष्ट्राशी संबंध आला होता. त्या ब्राह्मो समाजाचे मराठी रूप असणाऱ्या प्रार्थना समाजाने तुकारामांच्या तत्त्वज्ञानालाच आधार बनवले होते. त्या प्रभावातून त्यांनीही तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादित केले आहेत. शांतिनिकेतनातल्या कलाभवनचे प्रमुख आणि जागतिक कीतीर्चे चित्रकार नंदलाल बोस यांच्याकडून गांधीजींनी तुकारामांची चित्रे काढून घेतली होती. डॉ. भिंगारेंच्या तुकाराम गाथेच्या हिंदी अनुवादात ही चित्रे छापण्यात आली आहेत.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वारकरी विचारांचा वारसा मानणारी महाराष्ट्रातील एक पिढी गांधीजींकडे ओढली गेली. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले. साने गुरुजी , तुकडोजी महाराज , दादा धर्माधिकारी , विनोबा भावे , अच्युतराव पटवर्धन , सेनापती बापट ही त्यातली काही महत्त्वाची नावे. या पिढीनेच साने गुरुजींच्या नेतृत्वात विठ्ठलमुक्तीसाठी मंदिरप्रवेशाचे आंदोलन केले. तुकारामांच्या विठोबाच्या मुक्तीसाठी गांधीजींचे तत्त्वज्ञान धावून आले. पण मुळात हे तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे होतेच कुठे ?

Tuesday, January 27, 2009

बीड जिल्ह्यात ग्रामसभेनंतर दलितांची चार घरे जाळली


प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत वाद झाल्यानंतर दलितांची घरे पेटवून देण्यात आली; त्यात मोठे नुकसान झाले.
चौसाळा - प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेत पाणी योजनेसंदर्भातील वाद उफाळून आल्याने दलित सरपंचासह चौघांची घरे पेटवून देण्यात आली. बीड तालुक्‍यातील खडकीघाट येथे घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे.खडकी (ता. बीड) हे गाव तांदळवाडी तलावामध्ये जात असल्याने त्याचे पुनर्वसन करावे लागत आहे. गावात भारत निर्माण योजनेंतर्गत 'महाजल' योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ४४ लाख रुपये खर्चाच्या योजनेस मंजुरी मिळाली आहे. ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. सरपंचपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून पोपट वाघमारे सरपंच आहेत. सोमवारी ध्वजवंदन झाल्यानंतर दहाच्या सुमारास सरपंच पोपट वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेस सुरवात झाली. सभेत "महाजल'च्या कामाचा विषय विरोधकांनी काढला. पाणीपुरवठा समितीचे अध्यक्षपद भागवत वाघ यांच्याकडे आहे. या समितीत सरपंचाच्या जवळचेच लोक असून भागवत वाघ यांनी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामसभेत विरोधकांनी केला, यावरून वाद चिघळला.


वाचकांच्या प्रतिक्रिया


On January 28th 8:01 AM, Dinkar said:
Hello ! What You want show from this type of news displayed on headline and this type of feedback. Really If had feel guilty then you just do for that using right way and from ourself dont say they doing wrong, what do you mean of this comment had all people given.

On January 28th 8:01 AM, Hrishikesh KUlkarni said:
हा प्रकार किती वेदनादायी आहे! हिंदू धर्मातल्या जातींमधील उच्च-नीचता कधी नष्ट होणार? आपले राजकीय पुढारी काय करतात? स्वतःचा वाढदिवस आला की सगळीकडे स्वतःचा ढोल बडवणारे पुढारी अशा वेळी कुठे असतात? समाजाच्या दुःखांवर फुंकर घालून त्याचे आजार बरे करू शकणारे पुढारी कुठे असतात? ते निवडणुकांत का दिसत नाहीत? आता झालेल्या प्रकाराचे भांडवल करून, सवर्ण विरुद्ध दलित अशी आग पेटवून स्वार्थ साधणार्यां अशांच पुढार्यांची रांग लागेल. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय तर मिळणार नाहीच पण या हरामखोर राजकारण्यांचं मात्र फावेल.

On January 28th 8:01 AM, ??????? ???????? said:
हा प्रकार किती वेदनादायी आहे! हिंदू धर्मातल्या जातींमधील उच्च-नीचता कधी नष्ट होणार? आपले राजकीय पुढारी काय करतात? स्वतःचा वाढदिवस आला की सगळीकडे स्वतःचा ढोल बडवणारे पुढारी अशा वेळी कुठे असतात? समाजाच्या दुःखांवर फुंकर घालून त्याचे आजार बरे करू शकणारे पुढारी कुठे असतात? ते निवडणुकांत का दिसत नाहीत? आता झालेल्या प्रकाराचे भांडवल करून, सवर्ण विरुद्ध दलित अशी आग पेटवून स्वार्थ साधणार्यां अशांच पुढार्यांची रांग लागेल. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय तर मिळणार नाहीच पण या हरामखोर राजकारण्यांचं मात्र फावेल.

भारत हा भिकारड्या लोकांचा आणि उठल्या पडल्या राजकारण करणार्‍यांचा देश आहे. सभ्यता, सौजन्य या गोष्टी शिल्लक राहिलेल्या नाहीत. घडलेली घटना ही सूद्धा राजकारणाचाच भाग आहे. पण मेडीया नेहमीच असल्या गोष्टी मसाला लावून लोकांसमोर आणतो. दलितांची चार घरे जाळली ही कशी भारदस्त हेडलाईन वाटते. " ग्रामसभेत वादावादी " एवढी साधे शिर्षक देवून स्थानिक पातळीवर हे मिटवता आले असते. पण आता या घटनेचा सगळ्यांनाच येत्या निवडणूकीत वापर करता येईल. खरं म्हणजे दलित, सवर्ण असे काही आता शिल्लकच राहिलेले नाही.या शब्दांवर देखील बंदी आणली पाहिजे. पण मायबाप सरकारनेच या सगळ्या गोष्टी ( जातवारी, आरक्षणे ) निर्माण केलेल्या आहेत. जेवढी अस्वस्थता समाजात राहील तेवढी राजकारण्यांना हवीच आहे. त्याशिवाय त्यांची पोळी भाजणार कशी ? ( भागवत बाळनाथ सोनवणे )

Sunday, January 18, 2009

सत्तासंघर्षाची कथा...

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अशी काही चीज असते की विचारायला नको. त्या खुर्चिवरएकदा कुणी बसला की ती माणसातील गुणदोष ठळक आणि ठसठशीत करते. त्या खुचीर्वर बसण्याची अनेकांची इच्छा असते. पण दहाबारा कोटीत एखाद दुसऱ्याच्याच ती वाट्याला येते. या खुचीर्साठी चाललेल्या स्पधेर्चे एक वैशिष्ट्य म्हणजे तिला सातत्य असते. खुर्चीतबसलेल्या व्यक्तीला खाली खेचून स्वत: खुर्चीत बसणे, हा अनेकांचा अजेंडा असतो. त्याचवेळी खुर्चीत बसलेला नेता त्या खुर्चीच्या जवळपास कुणी फिरकू नये, अशी व्यवस्था करण्यात तो गर्क असतो. खुर्ची काढून घेण्यासाठी युक्त्या प्रयुक्त्या केल्या जातात. त्या तक्रारी आणि कागाळ्यांच्या पलीकडच्या असतात. तक्रारी आणि कागाळ्यांना राजकारणात फारसे महत्त्व नसते. कुणी त्या तशा करत असेल तर क्षुल्लक म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. राजकारणात मुरलेले लोक तक्रारदाराची भूमिका कधी करत नाहीत. ती भूमिका पार पाडण्यासाठी कार्यकतेर् आणि अनुयायी यांचा वेगळा संच असते. राजकाणातील मुरब्बी नेत्याला चकव्यात फसवायला बघतात. तो एकदा त्या चकव्यात सापडला की रानोमाळ भटकत राहतो. पण खुर्चीत बसलेलाही सावध असतो. तो चकव्याला बळी न पडता इतरांसाठी तो सापळे लावत असतो. आणि त्यात कोणी फसले की त्याला जायबंदी करून राजकीय वनवासात पाठवतो. मागे विलासराव जावेत यासाठी कुणी काय कमी फिल्डिंग लावली होती का? अगदी ९९ सालापासून त्यांना हुसकावण्याचे प्रयत्न चालू होते. नारायणराव त्यांचे राज्य खालसा करून भगवा ध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात होते. पण ते काही केल्या सफल झाले नाहीत. अर्थात ते तेव्हा विरोधात होते. पण त्यांचे सोडा. खुद्द काँग्रेसवालेही त्यांना हुसकावण्याच्या प्रयत्नात होते. पण विलासरावांनी त्यांच्याशी जवळपास तीन-साडेतीन वषेर् दोनहात केले. पण अचानक एका क्षणी श्ाेष्ठींनी राज्याची परिस्थिती पाहून त्यांना दूर केले. ते तसे का केले, हे विलासरावांना शेवटपर्यंत कळले नाही. पण पक्षांतर्गत विरोधकांशी दोन हात करता करता विलासरावांनी एक एक करून सापळा लावून सगळ्यांना घरी पाठवले. पुढे तर त्यातील काही राजकीय विजनवासातच गेले. ... सापळा लावायचा. शिकार उचकावयाची. म्हणजे ती आपोआप सापळ्यात सापडते. आता नाही का नारायण राणे स्वाभिमानी म्हणवतात पण पक्षाने निलंबित करूनही राजीनामा देत नाहीत, असे म्हणाले. हा राण्यांना उचकावण्याचा प्रकार होता. असेच त्यांनी एकेकाळी रणजितबाबूंना उचकावले होते. राणे आणि रणजितबाबू दोघेही हॉट हेडेड. रणजितबाबूंनी प्रतिवाद केला आणि सापळ्यात अडकले. विलासरावांनी आपले विरोधक असे संपवले खरे. पण तेच एकदा विरोधकांच्या चकव्यात फसले आणि मग लातूरच्या माळावर भटकत राहिले. तीन-साडेतीन वषेर् शक्कल लढवून विरोधकांना संपविण्याचे जे राजकारण केले ते सगळे मुसळ केरात गेले. विशेष म्हणजे त्यांचे मित्र म्हणविणारे सुशीलकुमारच त्यांच्या खुचीर्वर बसले. राष्ट्रवादीवाले आणि त्यातल्या त्यात शरद पवार हे २००४च्या निवडणुकीनंतर कोणत्याही स्थितीत काँग्रेसतफेर् सुशीलकुमारच परत यावेत, यासाठी प्रयत्न करीत होते. त्यासाठी सापळे, चकवे सगळ्यांची योजना राष्ट्रवादीने अत्यंत कुशलतेने केली होती. म्हणजे असे, की आम्हाला ते मुख्यमंत्रीपद नकोच मुळी. काँग्रेसवाल्यांना हे ऐकून एकदम ठसकाच लागला. आणि बघता बघता त्यांनी विलासरावांना मुख्यमंत्री करून त्याच सापळ्यात राष्ट्रवादीला जायबंदी केले. पुढे राणेच थेट काँग्रेसमध्ये आले तेव्हा लातूरकरांना बाभळीचे फेस आठवले. अवघ्या वर्ष-सहामाहीत राणे-विलासरावांचे प्रेम आटले आणि पुढे मग थेट खुचीर्लाच धोकाच दिसायला लागला, तेव्हा विलासरावांनी राण्यांसाठी जागोजाग सापळे लावले. गळ टाकले. फाईल गळाला लागली की कपाटात बंद व्हायला लागली. राणे संतप्त. पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. म्हणजे राणे काँग्रेसमध्ये आल्यावर लगोलग मला मुख्यमंत्री करा, असे म्हणत नव्हते. पण विलासरावांनी ते आपल्या विरोधात उभे राहतील याची काळजी घेतली. कारण राणे एकदा विरोधात उभे राहिले तर उघडपणेच युद्ध करणार. आणि उघड युद्ध आपल्याच पथ्यावर पडणार हे त्यांनी पुरते ओळखले होते. राणे उघडपणे टीका करीत गेले आणि विलासरावांचे संरक्षक बुरुज अधिक मजबूत होत गेले. त्यामुळे राण्यांनी टीका केली की मुख्यमंत्रीपदाला असलेला धोका सहा-आठ महिन्यांनी पुढेपुढे जात राहिला. राणेंची टीका ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. तशात अचानक एके दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला. मुंबई पोलिस, नेव्हल कमांडो आणि एनएसजीने त्यांचा खातमा केला. या प्रकारात दोनएकशे लोकांचा बळी गेला होता. लोक हळहळत होते. याचे रूपांतर अचानक लोकक्षोभात झाले. क्षोभ दहशतवादी हल्ल्यापेक्षा मोठा होता. हजारो लोक मेणबत्त्या घेऊन 'गेट वे ऑफ इंडिया'ला जमले. का जमले, कसे जमले, त्यामागे कोणत्या राजकीय शक्ती होत्या, इव्हेंट मॅनेजमेंटची कोणती कंपनी पडद्यामागे होती, हे सगळेच गौडबंगाल आहे. पण ते तिथे इतक्या संख्येने जमल्याने दिल्लीत हलचल झाली. महाराष्ट्रात काही खरे नाही, असाच संदेश गेला. हल्ला संपताच विलासरावांनी ताजला भेट देऊन पाहणी केली. झाले उलटेच. मग हीच ती वेळ असे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांना घरी पाठवले. हा धक्काही विलासरावांना जबर होता. कारण आता त्यांच्याच राजीनाम्याचे फर्मान बाकी होते. आणि तेही निघालेच. ते एका पाठोपाठ एक सापळे लावत चालले असताना अचानक तेच पुन्हा एकदा चकव्यात सापडले. पण विलासराव मुळातच धोरणी असल्याने त्यांनी लगोलग अशोक चव्हाणांशी मांडवली केली. मुख्यमंत्रीपदी त्यांचे नाव पुढे करून राण्यांना चेकमेट केले. आपला उत्तराधिकारी किमान कट्टर शत्रू तरी नको, असा विचार होता. या भानगडीत ज्यांनी अधीर् लढाई जिंकली त्या यशाचेही राण्यांना विस्मरण झाले. मग ते अंधाधुंद फैरी झाडत सुटले. मग तर विलासरावांचे कामच झाले. सत्तासंघर्षाची कथा इथे संपायला हरकत नव्हती. पण नियतीला ते मंजूर नसावे. खरे म्हणजे, नांदेड आणि लातूरमधून विस्तूही जात नव्हता. पण नांदेडच्या हातात पुन्हा एकदा राज्याची सूत्रे यावीत, यासाठी लातूरची मदत कामी आली. पण लातूरच्या प्रयत्नाने मुख्यमंत्रीपद घेऊन पांग फेडणे परवडणारे नव्हते. मुख्यमंत्रीपद घ्यायला हरकत काहीच नाही. त्यांना राणे नको होते म्हणून नांदेडच्या पारड्यात लातूरचे वजन पडले. यात सोय होती, यात उपकार ते कसले. श्ाेष्ठींचा कल नांदेडच्या बाजूचा असता तर त्याच नांदेडची चारीबाजूने नाकेबंदी करायला लातूरने कमी केले नसते. मुख्यमंत्रीपदाच्या सोहळ्याचा मांडव अजून उतरवला जात होता, तेव्हा ध्यानीमनी नसताना अचानक नांदेडला महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. विलासरावांना चटकाच बसला. चकवा पुन्हा भेटला होता. शिवाय, राण्यांवरचे विनोद रंगले असतानाच मैफलीचा बेरंग झाला, तो निराळाच. सत्तासंघर्ष निरंतर असतो, हेच खरे.