Tuesday, April 13, 2010

बौद्ध-मातंग भेदनीती कशासाठी?


मातंग पुढाऱ्यांचा बौद्ध समाजावर असा एक आरोप राहत आला आहे की, राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाचा लाभ बौद्ध समाजानेच घेतल्यामुळे मातंग समाजावर अन्याय झाला असून, मातंग समाज विकासापासून वंचित राहिला आहे. त्यांच्या या भूमिकेत थोडेफार तथ्य असते तर गोष्ट वेगळी. पण मातंग पुढारी मातंग समाजाच्या प्रेमातून नव्हे तर राजकीय स्वार्थासाठी बौद्ध-मातंग असा खोटा भेद निर्माण करत असतात. दलितांसाठी असलेल्या एकूण १५ टक्के आरक्षणात मातंग समाजासाठी आठ टक्के वेगळे आरक्षण ठेवण्यात यावे, अशी फाटाफुटीची द्वेषमूलक भाषाही ते करू लागले आहेत. नांदेड मुक्कामी २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मातंग समाजाचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यात मातंग समाजासाठी वेगळे आठ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणी करतानाच मातंग समाज हिंदू म्हणूनच जगणार व हिंदू म्हणूनच मरणार (कुणाचे काय जाते?) अशीही लाचार भाषा तिथे वापरली गेली. जालना येथेही मातंग एकता आंदोलनाच्या पुढाऱ्यांनी क्रांतिगुरू लहुजी साळवे अभ्यास आयोगाने सूचित केल्याप्रमाणे मातंग समाजास अनुसूचित जातीचे स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष बलदेवचंद यांच्याकडे केली.
मातंग समाजासाठी वेगळे आरक्षण मागणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना इतकेही भान नाही की, आरक्षणाची कसोटी ही सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-आíथक भिन्नता असते. बौद्ध व मातंग समाजात कोणती सामाजिक-सांस्कृतिक भिन्नता आहे? सनातन हिंदू धर्माने दोघांनाही अस्पृश्य ठरविले. दोघांनाही शिक्षण, व्यवसायस्वातंत्र्य व अन्य मूलभूत मानवी अधिकार नाकारले. दोन्ही समाजाचे खानपान सारखेच आहे. बौद्ध-मातंग हा सनातनी हिंदू समाजव्यवस्थेने एक द्वंद्व समाजच मानला आहे आणि तसाच तो आहे. म्हणूनच तर एखाद्याला शिवी देतानाही तथाकथित उच्चवर्णीय म्हणतात, ‘काय महारा-मांगासारखा वागतोस?’ म्हणजेच बौद्ध-मांग एकच आहेत. तसे नसते तर नामांतरासाठी पोचीराम कांबळेने हौतात्म्यच पत्करले नसते. सामाजिक वास्तव हे असे असताना मातंग पुढारी मातंग समाजासाठी वेगळे आरक्षण मागतात याचा अर्थ काय? तर तो असा की, त्यांना राजकीय स्वार्थासाठी दलित समाजात फूट पाडावयाची आहे. सत्ताधाऱ्यांनाही राज्याच्या एकूण लोकसंख्येत २२ टक्के असलेली दलित-मागासवर्गीय आदिवासींची शक्ती फोडून एक संख्येच्या दृष्टीने मोठी असलेली मातंग जात कह्यात ठेवून सत्तास्पर्धेचे राजकारण करायचे आहे. मातंग पुढाऱ्यांना खरोखरच मातंग समाजाची काळजी असेल तर ते असे म्हणू शकतात की, आरक्षणाचा लाभ घेऊन जी बौद्ध मंडळी प्रस्थापित झाली त्यांनी आता आरक्षणाचे फायदे घेणे थांबवून त्याचा लाभ वंचित मातंगाना घेऊ द्यावा. पण अशी न्यायसंगत भूमिका न घेता ते वेगळ्या आठ टक्के आरक्षणाची मागणी करतात.
बौद्ध समाजानेच आरक्षणाचा लाभ घेतल्यामुळे मातंग समाजाचा विकास झाला नाही, अशी भूमिका घेणाऱ्या मातंग पुढाऱ्यांनी हे सांगावे की, मातंग समाजाच्या भल्यासाठी त्यांनी काय केले? मातंग समाजाच्या आमदारांची संख्या कमी का आहे? शिवसेना, काँग्रेस वा राष्ट्रवादीतून आमदारकी मिळविणारे मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करतात की त्या त्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात? तात्पर्य, मंत्रिपदे, आमदारक्या मिळवूनही जर मातंग पुढाऱ्यांना मातंग समाजाचा विकास करता येत नसेल तर बौद्ध समाजानेच तुमच्या साऱ्या सवलती पळविल्या, अशी मातंग समाजाची दिशाभूल करणारी भूमिका त्यांनी का घ्यावी? भेदनीतीचा वापर करून अधिकाधिक सत्तापदे मिळविण्यासाठीच ना?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त अस्पृश्यांच्या कल्याणासाठीच सामाजिक समतेचे लढे उभारले होते. पण बाबासाहेबांच्या या लढय़ांपासून मातंग पुढारी कटाक्षाने दूर राहिले. बाबासाहेबांनी अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिरात प्रवेश करण्याची चळवळ १९२५ साली सुरू केली होती. या चळवळीला मातंग पुढाऱ्यांनी विरोध केला होता. २८ ऑगस्ट १९२७ रोजी ब्राह्मणेतर पुढाऱ्यांची एक सभा अमरावती येथे झाली. त्या सभेत डॉ. पंजाबराव देशमुख, गोपाळराव देशमुख आदी ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी सत्याग्रहास पाठिंबा देऊन सर्व अस्पृश्यांनी या सत्याग्रहात सहभागी व्हावे असे म्हटले होते. काही मातंगांनीही या पत्रकावर सह्या केल्या होत्या. पण पुढे मातंग बंधू बदलले. त्यांनी तेव्हाच्या ‘उदय’ पत्रात आपली भूमिका जाहीर केली, ‘महार पुढाऱ्यांनी जाती सुधारणेच्या नावाखाली आमच्या सह्या घेतल्या म्हणून आम्ही गणेश थिएटरातील बैठकीला गेलो. पण तिथे जाती सुधारणेचा नव्हे तर अंबेच्या देवळात जाऊन दर्शन घेण्याचा विषय निघाला. ही वृत्ती सनातन धर्माला धक्का देणारी आहे, म्हणून ती आम्हाला मंजूर नाही.’
मातंग समाजातील पुढारी सकट हिंदुत्ववाद्यांना खूश करण्यासाठी बाबासाहेबांच्या विरोधात सतत बोलत असत. सकटांनी भोपटकरांच्या ‘भाला’तून लिहिले होते, ‘महार लोक मांगांना कमी लेखतात. त्यांना आपल्या विहिरीवर पाणी भरू देत नाहीत. त्यांचा नवरदेव घोडय़ावर बसून जाऊ देत नाहीत. तेव्हा महार लोकांनी मांग लोकांस आधी समान लेखावे व मग स्पृश्य हिंदूंशी समतेचा झगडा करावा.’ सकटांचे बोलविते धनी श्री. म. माटे व ‘भाला’कार भोपटकर होते, अशीच इतिहासाची साक्ष आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाडय़ातील (पाथरी- जि. परभणी) एक मातंग पुढारी देविदास कांबळे यांनीही १९४१ साली विरोध केला होता. बाबासाहेबांना पत्र लिहिताना कांबळेंनी म्हटले होते, ‘श्रद्धा व अज्ञानाने महार समाज आपल्या फोटोची पूजा करतो. महारांचे हे अंधानुकरण मी मांगांना करू देणार नाही.’ बाबासाहेबांनी या पत्राला उत्तर देताना म्हटले होते, ‘अवस-पुनव मागण्यापेक्षाही माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे. महार लोकांतूनही हे खूळ तुम्ही नाहीसे करा.’ देविदास कांबळेंनी यावर म्हटले होते, ‘मी म्हणतो तसे न वागलात तर आमचा मार्ग भिन्न राहील.’ बाबासाहेबांनी या संदर्भात कांबळेंना दिलेले उत्तर महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘विचारपूर्वक वेगळा मार्ग स्वीकारला व तो जर उन्नतीचा असेल तर काहीच हरकत नाही, पण महारांशी काडीमोड करून सनातनी पक्ष-संघटना व काँग्रेसची गुलामगिरी करणे एवढाच वेगळ्या मार्गाचा अर्थ असेल तर यात काही मांग व्यक्तींचा फायदा असेल, पण मांग जातीचा नव्हे.’ बाबासाहेब म्हणतात तसे गेल्या पन्नास-साठ वर्षांत मातंग पुढाऱ्यांची कोती नि स्वार्थी दृष्टी बदललीच नाही, यातच मातंग समाजाच्या अवनतीचे मूळ दडले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने बौद्ध समाज पोटाला चिमटा घेऊन झपाटल्यागत शिकू लागला. शिक्षणाच्या बळावरच बौद्ध समाजाने आरक्षणाचा फायदा उचलत सरकारी नोकऱ्या मिळविल्या. मातंग समाज शिक्षणाअभावी मागे पडला. अशा स्थितीत बौद्धांनीच सर्व सवलती लाटल्या असा शंख करण्यात काय अर्थ आहे? शिवाय आरक्षण राबविणाऱ्या सरकारी यंत्रणेत तर उच्चवर्णीयच ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी पक्षपातीपणे बौद्धांना जवळ करून मातंगांना मुद्दाम डावलले असे कसे म्हणता येईल? बरे, आजची आरक्षणविषयक स्थिती काय आहे? तर जागरूक, स्वाभिमानी बौद्धांपेक्षा लाचार- कानाखालचे मातंग-चर्मकार परवडले म्हणून सरकारी नोकऱ्यांत बौद्धांना डावलून मातंग-चर्मकारांना प्राधान्य देण्यात येते. हे वास्तव असताना मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण कशाला हवे आहे?
डॉ. आंबेडकरांनी समस्त दलित समाजाची सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-आर्थिक शोषणातून मुक्तता करण्यासाठीच घटनेत सोयी-सवलतींच्या तरतुदी करून ठेवल्या. प्रश्न असा की, मातंग समाजाचे पूर्वापार र्सवकष शोषण कोण करीत आले? तर परंपरावादी बुरसटलेले सवर्ण. मग त्यांना सोडून मातंग समाजाच्या मागासपणास मातंग पुढारी बौद्ध समाजासच कसे काय जबाबदार धरतात? मातंग समाजाच्या अवनतीस कारणीभूत ठरलेल्या हिंदू रूढी-परंपरांविरुद्ध बंड करून न उठता आम्ही हिंदू मांगच आहोत अशी लाचार भाषा उच्चारताना मातंग पुढाऱ्यांना काहीच कसे वाटत नाही? गावकीची कामे मातंग समाज कसा काय करतो? मातंग पुढाऱ्यांना आंबेडकरवाद स्वीकारायचा नसेल तर त्यांनी तो स्वीकारू नये, पण किमान अण्णाभाऊ साठेंनी नवा समाज घडविण्यासाठी शोषण रूढी परंपरांच्या विरोधी जो बंडाचा झेंडा रोवला तो अण्णाभाऊंचा विद्रोही विचार तरी मातंग पुढारी समजून घेणार आहेत काय? सवर्ण मुलीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून औरंगाबाद जिल्ह्य़ातील पाल गावात तुपे या मातंग तरुणास गावकरी दगडाने ठेचून मारतात आणि नांदेड जिल्ह्य़ातही प्रेमप्रकरणातूनच चंद्रकांत पंडित या मातंग युवकाचे डोळे फोडले जातात, तरी ज्या मातंग पुढाऱ्यांना हिंदू म्हणवून घेताना लाज वाटत नाही त्यांनी बौद्धांच्या नावे बोटे मोडून स्वतंत्र आरक्षणाची भाषा का करावी? आणि मातंग पुढाऱ्यांनी स्वतंत्र आरक्षण मागितले म्हणून खरोखरच ते मिळणार आहे काय? सर्वोच्च न्यायालय दलितांतर्गत असे स्वतंत्र आरक्षण मान्य तरी करील काय? मातंग पुढारी मग कशासाठी मातंग समाजाची दिशाभूल करीत आहेत?
मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाच्या बढाया मारणाऱ्या मातंग पुढाऱ्यांना हे विचारले पाहिजे की कोणत्या सामाजिक न्यायाच्या लढाईत मातंग पुढारी सहभागी होते? दलित समाजावर खेडोपाडी अत्याचार होत असताना किती जण तिथे धावून गेले वा जातात? मातंगांवर जुलूम झाला तरी बौद्धच तिथे धावून जातात ना? मग मातंग पुढाऱ्यांनी बौद्धांचा द्वेष का करावा?
नामांतर लढय़ात एक शहीद पोचीराम कांबळेचा अपवाद केला तर किती मातंग पुढारी सहभागी झाले होते? मंडल आयोगाच्या लढाईत मातंग पुढारी होते काय? भूमिहीनांचे कोणते लढे मातंग पुढाऱ्यांनी लढविले? फुले-शाहू-आंबेडकरांचा कोणता परिवर्तनवादी वारसा मातंग पुढाऱ्यांनी जोपासला? कोणत्या प्रश्नावर मातंग पुढाऱ्यांनी लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या? तुरुंगवास भोगला? मातंग समाजाच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर तरी मातंग पुढाऱ्यांनी चळवळी उभारल्या काय? त्यांना विकासच हवा तर त्यांनी प्रस्थापित राजकीय व सामाजिक व्यवस्थेविरुद्ध आधी लढावे. आपसूकच मग मातंग समाजाचा विकास होईल. पण असे न करता लाचार- कोते- गुलाम मन कायम ठेवून स्वतंत्र आरक्षणाच्या कितीही बाता मारल्या म्हणजे मातंग समाजाचा विकास होईल अशा भ्रमात जर मातंग पुढारी वावरत असतील तर ते वेडय़ांच्या नंदनवनातच वावरत आहेत असेच म्हणावे लागेल.
मातंग समाजाला फितविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी, मग ते कुठल्या का पक्षाचे असेनात, हे लक्षात घ्यावे की, बौद्धांच्या विरोधात मातंग समाजाला चिथावून, दलित समाजात फूट पाडण्याचे धूर्त राजकारण खेळून मातंग समाजाचे काहीही भले होणारे नाही.
मातंग समाजाविषयी सत्ताधाऱ्यांना खरोखरच आस्था असेल तर सरकारने मातंग समाजाच्या जीवन-मरणाच्या ज्वलंत प्रश्नात अवश्य लक्ष घालावे. पण मतलबी बौद्ध-मातंग वादास खतपाणी घालून दलित शक्ती फोडण्याचे पाप करू नये.