Saturday, February 14, 2009

पृथ्वीच्या जैविक पसाऱ्याचे सूत्र


१२ फेब्रुवारी २००९ ही चार्ल्स डार्विनची २०० वी जयंती. यंदा त्याच्या उत्क्रांतीवादाला १५० वर्षे होत आहे. आधुनिक विज्ञानाचा तो पाया असला तरी सिद्धांत मांडण्यात आला तेव्हा तो अमान्यच झाला. त्याचे महत्त्व पटायला विद्वान माणसाच्या अनेक पिढय़ा जाव्या लागल्या..
या वर्षी म्हणजे २००९ साली गॅलिलिओप्रणीत खगोल विचारांना ४०० वर्षे पूर्ण झाली. याच वर्षांमध्ये डार्विनची २०० वी जयंती आहे आणि ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’ या त्याच्या


क्रांतिकारक सिद्धांताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. गॅलिलिओच्या सिद्धांताने माजलेली खळबळ आता ओसरली आहे. चर्चच्या धर्म मरतडांनी गॅलिलिओला मरणोत्तर माफीसुद्धा जाहीर केली आहे. पण तितकाच व्यापक आणि क्रांतिकारक असलेल्या डार्विनला हे भाग्य अजून लाभायचे आहे.
‘उत्क्रांती’ ही कल्पना इरास्युख डार्विन यांनी म्हणजे चार्ल्स डार्विनच्या आजोबांनी सुचविली होती. नंतर ज्यो बाप्तिस्ता जाँ हमारने तिचा पाठपुरावा केला. डार्विनचे काही समकालीनदेखील या कल्पनेच्या उभारणीत होते. परंतु त्या कल्पनेला आधारभूत असा कार्यकारणभाव व त्यातले इंगित त्यांना गवसले नव्हते. अफाट निरीक्षणे, पुरावे, माहिती याच्या जंजाळात तर्कसंगती शोधताना चार्ल्स डार्विनला ‘निसर्गाचा वेचकपणा’ किंवा ‘निवडीचे सूत्र’ गवसले. ‘ऑरिजिन अव्ह स्पेसीज’मुळे धर्ममरतड बिथरले. तो संताप अजून विरलेला नाही. तो अजूनही निर्मिकवाद (क्रिएशनिझम) विरुद्ध बुद्धीपुरस्सर योजनावाद (इंटेलिजंट डिझाइन) असा खदखदतोच आहे.
पण यापेक्षा अधिक पोषक उत्पात जीवशास्त्रात झाला. जीवशास्त्रज्ञ मोठय़ा चिकाटीने जीवाश्म, जीवांचे नमुने गोळा करीत होते. ते पारखून त्यांची वर्गवारी करीत होते. पण सर्वाच्या मुळाशी काही साधम्र्य आहे, त्यांच्यातली विविधताही काही सांगते का, हे त्यांना शोधावेच लागले. ही विविधता कशी उपजली? कशामुळे? त्याला काही सूत्र आहे का? जीव उपजले, कोणी तगले, कोणी निमाले, असे कशाने होते? परिस्थितीशी जुळवून घेणारे (अनुकूलन साधणारे) तगतात. त्यांच्याच वर्गातला वंश बघायला मिळतो. (निसर्गाची निवड) अशी काही विशिष्ट यंत्रणा असते का? अशा प्रश्नाशी भिडता भिडता जीवशास्त्रीय माहितीला, तथ्यांना, विचारांना एक चौकट आवश्यक वाटली. चार्ल्स डार्विनने त्यांचा वेध घेताना इतके पुरावे आणि निसर्गातल्या साक्षी समोर ठेवल्या की त्यामुळे ‘उत्क्रांती’ ही अटकळवजा कल्पना राहिली नाही.
दिवसागणिक पुराजीवी व सूक्ष्म जीवशास्त्राला इतके पुरावे व दाखले लाभत गेले की, त्याचे ठाशीव सिद्धांत बनले. आजघडीला असलेल्या उत्क्रांतीशास्त्राची पायाभरणी डार्विनने केली. त्यातली सगळी दालने त्याने उघडली, असे नव्हे. आज उपलब्ध असलेले अनुवंशशास्त्र, संख्याशास्त्र, जनुकशास्त्र आणि त्यांच्या प्रष्टद्धr(२२४)नांचा छडा लावण्याच्या रीती तेव्हा नव्हत्या. मेंडेलचे अनुवंश व जनुकविषयक प्रतिपादन प्रकाशित झाले तेव्हा ‘उत्क्रांती’ कल्पनेचा अवतार संपला, असे बहुतेक लोक मानू लागले होते. पण फिशर, हाल्डेन प्रभृतींच्या संशोधन व विचारातून उलटेच झाले. उत्क्रांतीशास्त्र अधिक बळकट आणि व्यापक झाले.
संशोधनाची उपकरणे आणि सीमारेषा सुधारत गेल्या, तसे या सिद्धांताचे रूप अधिक समावेशक बनू लागले. हा शास्त्रविचार एककलमी गुरुकिल्लीवाद नाही. जीवसृष्टीच्या घडामोडींचा उलगडा परस्परबद्ध पण भिन्न सूत्रांनी केला जातो. नैसर्गिक निवड, उत्परिवर्तन (म्यूटेशन), अनुवंशता, अनुकूलन, अनिश्चितता आणि संभाव्यता अशा निरनिराळ्या प्रेरणांची एकवट कालौघात कशी प्रकटते याचा शोध घेणारी ही प्रणाली आहे.
जीव रसायने, बिजाणूशास्त्र, नॅनोतंत्र यांच्या संकराने जीवशास्त्राची छबी झपाटय़ाने पालटते आहे. जीवाबद्दलचे आकलन जैवतंत्रातल्या सुधारणांमुळे अधिक धारदार बनत चालले आहे. याला चालना उत्क्रांतीशास्त्रामुळेच मिळाली.
जीवांमधील संघर्ष सहज आहे. उत्क्रांती आणि परिसर, पर्यावरण यांचा कसा कसा संबंध येतो? अशा कितीतरी विभिन्न प्रश्नांनी प्रेरित केलेल्या नव्या शाखा उदयाला आल्या आहेत. औषधविज्ञानापासून मनोविज्ञानापर्यंत उत्क्रांतीशास्त्राची छाया पसरली आहे. उत्क्रांतीशास्त्र हे सगळ्या जैविक पसाऱ्याला एका परिघात आणणारी प्रणाली आहे. परंतु या व्यापक सिद्धांताची अजूनही समाजमानसात घडी बसलेली नाही. भल्याभल्या सुशिक्षितांच्या याबाबतच्या धारणा अगदी विपरित आहेत. ‘उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस बनला,’ ‘उत्क्रांती म्हणजे आपल्या दशावतार कथा’, ‘उत्क्रांती म्हणजे बळी तो कान पिळी’, ‘उत्क्रांती म्हणजे स्वार्थीपणे जगण्याचे तत्त्वज्ञान’ अशा अनेक बालीश अडाणी धारणांचा जबर पगडा आजही आहे. ‘निसर्गातील विविधता, चक्रावून टाकणारी यंत्रणा व सामग्री ही कुण्या अद्भूतकर्त्यांची नक्षीदार बुद्धीपुरस्सर करामत आहे’, ही श्रद्धा सहजी सुटत नाही. त्याला छेडणारे कुठले प्रतिपादन सहजी गळी उतरत नाही, त्याचा हा परिणाम असावा!
त्यातच या शास्त्राच्या वाटचालीत आणखी काही किटाळ त्याच्या वाटय़ाला आले. ‘सुप्रजनन शास्त्र’ म्हणजे हेतुपुरस्सर शेलक्या गुणधर्मीयांचा संकर घडवणे व त्यातून महाबळी, आदर्श जीव तयार करणे, ही कल्पना एकेकाळी लोकांच्या मनात अशी रुजली की ती सहजी पुसली जात नव्हती. अमेरिकेपासून कम्युनिस्ट रशियापर्यंत सर्वत्र हे वेड होते. ‘सुप्रजनन शास्त्रा’ची उत्क्रांती शाखेशी असणारी गणिती जवळीक आणि वेडगळ वंशश्रेष्ठत्व कल्पना यामुळे हे किटाळ उत्क्रांतीशास्त्रांतील कल्पनांवर उडाले. समाजशास्त्रामध्येही बळी तो कान पिळीसारखी सूत्रे लावून प्रतिपादन करणारे शास्त्रज्ञ उपजले.
वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. उत्क्रांतीशास्त्र उमगले तर वंशश्रेष्ठत्व, वर्णश्रेष्ठत्व, नैसर्गिक उच्चनीचता या कल्पनांना बाधा येते; पुष्टी मिळत नाही. चार्ल्स डार्विनचे काही बुजुर्ग चरित्रकार उत्क्रांतीच्या विचारामागे डार्विनचा गुलामगिरीला असलेला कडवा विरोध ही प्रेरणा होती, असे नमूद करतात. पण हे लक्षात कोण घेतो? काही तथाकथित विचारवंत रशियातील पडझडीनंतर ‘मार्क्‍स हरला डार्विन जिंकला’ असे अजागळ नारेवजा लेख लिहित होते!
दुर्दैवाने जीवशास्त्राला व्यापारी झळाळी नाही. आणि त्याचा बौद्धिक दरारा, दबदबा नाही. एकविसाव्या शतकामध्ये जैवतंत्रज्ञानाची चलती येणार असल्याने कदाचित ही अवस्था पालटेलही. पण या शाखांच्या प्रवेश खिडकीपाशी अजून विद्यार्थ्यांची रांग दिसत नाही. प्रयोगशाळा सहायक बनविण्याची कुवत असलेल्या बायोटेक्नॉलॉजीला मात्र तुरळक गर्दी लाभू लागली आहे. परिणामी या शाखांत व या शाखांना गोवणाऱ्या उत्क्रांती शास्त्राबद्दल अनास्था असल्यास नवल नाही.
सूक्ष्मजीव आणि विचार, त्यामुळे होणारे आजार, औषधे आणि औषधांना धाब्यावर बसवणारी जीवाणू विषाणूंची प्रतिकारशक्ती हा आटय़ापाटय़ा वैध शास्त्रातील लोक नित्याने अनुभवतात. पण याचा उत्क्रांतीशी काही संबंध आहे, अशी शंकादेखील त्यांना चाटूनदेखील जात नाही. उच्चविद्याविभूषितांची ही तऱ्हा तर सामान्यांची काय कथा? या क्रांतीकारक ग्रंथाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ही अनास्था दूर करत प्रबोधन करण्याचा शाळा, महाविद्यालये प्रयत्न करतील, अशी आशा करू या!

No comments: