Tuesday, February 24, 2009

अंधारातील इंद्रधनुष्य


‘ऑस्कर’ सोहळा म्हणजे केवळ हॉलीवूडचा दिमाखदार झगमगाट नाही. जागतिक चित्रपटसृष्टीचा तो झळाळणारा मापदंड आहे. ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवार्डस्’ या नावाने गेली ८१ वर्षे ओळखला जाणारा हा मापदंड बऱ्याच अंशी सार्वभौम आहे. कोणतीही बलाढय़ फिल्म कंपनी, कोणताही धनाढय़ कॉर्पोरेट ग्रुप, कोणताही गाजावाजा झालेला ख्यातनाम स्टुडिओ किंवा कोणताही राजकीय पुढारी वा खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष या पुरस्कारांवर आपला ‘प्रभाव’ टाकू शकत नाही. म्हणूनच, राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या या सोहळ्यातही काही वेळा स्पष्ट शब्दांत अमेरिकेच्या युद्धखोर धोरणाचा निषेध काही दिग्दर्शक- कलावंतांनी करण्याचे धैर्य दाखविले आहे. विशेष म्हणजे त्या सोहळ्याला हजर असलेल्या स्टार्स-सुपरस्टार्सनी तशा निषेधाचे टाळ्या वाजवून स्वागतही केले आहे. अमेरिकन महासत्तेच्या महाप्रांगणात अशी स्वायत्तता दाखवायची हिंमत मायकेल मूर, मार्लन ब्रॅण्डो, डस्टिन हॉफमन, जेन फोंडा, अ‍ॅन्थनी क्विन अशा अनेकांनी दाखविली असल्यामुळेही ‘ऑस्कर’च्या या मापदंडाला ती प्रतिष्ठा व तेज प्राप्त झाले आहे. अर्थातच ‘ऑस्कर’ सन्मानाची खरी प्रतिष्ठा त्यातून व्यक्त होणाऱ्या कलाकृतीच्या गुणवत्तेची असते. म्हणूनच भले भले दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, लोकप्रिय अभिनेते वा अभिनेत्री आणि इतर कलाकार ‘ऑस्कर’ सन्मानासाठी अक्षरश: जिवावर उदार होऊन त्याची प्रतीक्षा करीत असतात. कित्येक जणांची नावे पहिल्या टप्प्यात नामांकनाच्या यादीत झळकतात आणि प्रत्यक्ष पुरस्काराच्या दिवशी कुठेही दिसत नाहीत. अनेक वर्षे वाट पाहून, कित्येक वेळा आशा सोडून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या काही जान्या-मान्या कलावंतांना कधी तो आकस्मिकपणे सन्मान मिळतो आणि त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. पैसे, लोकप्रियता, प्रसिद्धी यापेक्षाही ‘ऑस्कर’ सन्मान प्रतिष्ठेचा वाटणे हा त्या ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस’चाच गौरव आहे, असे म्हणावयास हवे. या यादीत फ्रँक सिनात्रा, डेव्हिड लीनपासून ते अगदी केट विन्स्लेट (जिला रविवारी ‘द रीडर’साठी पुरस्कार मिळाला.) पर्यंत अनेक नामवंत सापडले होते. मेरिल स्ट्रीपसारख्या गुणी अभिनेत्रीला १५ वेळा नामांकन मिळूनही ती अजून प्रतीक्षेतच आहे. काहींना त्यांच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात जीवनगौरव ऊर्फ ‘लाइफ टाइम अ‍ॅचीव्हमेण्ट अ‍ॅवॉर्ड’ मिळाले, पण त्यांच्या कलाकृतीचा सन्मान झाला नाही. मुद्दा हा की, ‘ऑस्कर’ सन्मान ही वशिल्याने, पैशाने, दबावतंत्राने मिळत नाही. याचा अर्थ त्याबद्दल वाद होत नाहीत, असा नाही. कलाकृतींचा दर्जा वा गुणवत्तेबद्दल वाद होणे स्वाभाविक आहे; परंतु मतभेद व्यक्त करणारे रसिक व समीक्षकसुद्धा ‘ऑस्कर’ची दखल तितक्याच आदराने घेतात. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ला नामांकने मिळू लागल्यावर मात्र स्वयंभू सिनेपंडित, डावे ‘सर्वज्ञ’ विचारवंत, हिंदुत्व आणि हिंदू संस्कृती जपण्याचा मक्ता घेतलेले कार्यकर्ते आणि ‘शायनिंग इंडिया’ची कॉर्पोरेट जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर असल्यासारखे दाखविणारे भाष्यकार या सर्वानी या चित्रपटावर टीकेची झोडच उठवायला सुरुवात केली होती. त्यामुळे भारतात चित्रपट प्रकाशित व्हायच्या अगोदरच त्यावरची टीका प्रसिद्ध होऊ लागली होती. यात आघाडी जरी अमिताभ बच्चन यांनी घेतली असली तरी एकूण ‘इंटेलेक्च्युअल’ आणि लांब चेहऱ्याचे व विश्वाची चिंता वाहणारे काही ‘क्रिटिक’ ऊर्फ चिकित्सक-समीक्षक मात्र भारताच्या ‘दारिद्रय़ाच्या व्यापारीकरणा’मुळे व्यथित झाले होते. साहजिकच ‘स्लमडॉग’वरच्या चर्चेला काहीसे राजकीय रंग येऊ लागले होते. भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या पथावर असताना धारावीच्या विदारक स्थितीचे चित्रण करून, देशाला नाउमेद करण्याचा हा ‘डाव’ आहे, या उजव्यांच्या टीकेपासून ते कॉर्पोरेट शैलीत गरिबांची थट्टा करण्याचा हा एक कमर्शिअल कट आहे, या डाव्यांच्या टीकेपर्यंत ही समीक्षा गेली होती. ज्यांना या राजकीय चर्चेत जायचे नव्हते, पण तरीही ‘स्लमडॉग’ची भेदकता निर्थक ठरवायची होती त्यांनी ‘स्लमडॉग’ हे नावच झोपडपट्टीत राहणाऱ्यांना अपमानकारक आहे, असे म्हणावयास सुरुवात केली तर इतर काहींनी ‘काय नवीन आहे या चित्रपटात? सगळा बॉलीवूड मसालाच तर आहे’ असे म्हणून त्या चित्रपटाचे अवमूल्यन सुरू केले. काहींनी ‘रहमानच्या या संगीतात त्याची खरी भरारी आलेली नाही,’ असे म्हणायला तर इतर समीक्षकांनी ‘मूळ कादंबरी कितीतरी अधिक चांगली आहे व त्यापेक्षा चित्रपट अगदीच मामुली आहे,’ असे पांडित्य प्रकटायला सुरुवात केली. आता या सर्वच पंडितांची गोची झाली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कार देणाऱ्या ज्युरींना चित्रपट हे माध्यमच कळत नाही, अशी टीका त्यांना करता येणार नाही. कारण ‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस्’ देणाऱ्या आतापर्यंतच्या ज्युरींनी ‘गॉन विथ द विंड’ आणि ‘माय फेअर लेडी’ या चित्रपटांना, तसेच ‘गांधी’ आणि ‘शिंडलर्स लिस्ट’सारख्या चरित्रात्मक चित्रपटांना, ‘बेनहर’ आणि ‘टायटॅनिक’सारख्या महानिर्मितींना प्रत्येकी आठ वा त्याहूनही अधिक ऑस्कर सन्मान जाहीर केले होते. त्या चित्रपटांना दिलेले सन्मान बरोबर होते तर ‘स्लमडॉग’बद्दलचे त्यांचे सिनेज्ञान अपुरे पडले हे म्हणणे त्यांना कठीण आहे. शिवाय तमाम ज्युरींना एकमुखाने भारताची बदनामी करायची होती, हेही सिद्ध करणे त्यांना अशक्य आहे. त्याचप्रमाणे ‘स्लमडॉग’च्या निर्मात्यांनी ‘लॉबिंग’ करून सन्मान पळवले, असेही त्यांना म्हणता येणार नाही. कारण भारतातील विद्वान समीक्षकांनी लगेचच टीकेचा भडिमार सुरू केला होता. परंतु तरीही खळखळ उरतेच. पूर्वीच्या ‘बूट पॉलिश’ किंवा ‘आवारा’, ‘शहर और सपना’ व ‘फिर सुबह होगी’ अशा चित्रपटांमध्ये गरिबी, उपेक्षा, अन्याय हे सर्व आलेच होते. शिवाय ‘दीवार’ वा ‘कुली’सारख्या चित्रपटांमध्ये दारिद्रय़ाच्या दलदलीतून ऐश्वर्याच्या हवेलीपर्यंतचे, ‘रॅग्ज् टू रिचेस्’ प्रवासाचे चित्रणही केले गेले होते. मग ‘स्लमडॉग’ने काय नवीन सादर केले, असा प्रश्न विचारला जातो आहे. परंतु ‘स्लमडॉग’ची त्या चित्रपटांशी वा ‘सलाम बॉम्बे’शी किंवा ‘धारावी’ डॉक्युमेन्टरीशी तुलना करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. ‘स्लमडॉग’च्या दिग्दर्शकाने आपला चित्रपट सामाजिक बांधिलकीच्या ऊर्मीतून निर्माण झाला, असे कधीही म्हटलेले नाही. तसेच तो ‘समांतर’, ‘न्यू वेव्ह’ वा ‘आर्ट फिल्म’च्या परंपरेतला आहे असाही दावा त्यांनी केलेला नाही. आपण कादंबरीबरहुकूम चित्रपट काढला आहे, असेही म्हटलेले नाही. दिग्दर्शक आणि पटकथालेखक ब्रिटिश, बहुतेक तंत्रज्ञ भारतीय, अनेक कलाकार भारतीय, संगीत रहमानचे, ध्वनिसंकलन करणारा भारतीय, चित्रपट इंग्रजीतला (हिंदीत डब केलेला) हॉलिवूडच्या धर्तीवरचा हा ‘स्लमडॉग’ एकदम आठ सन्मान कशामुळे प्राप्त करू शकला? अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डस् देणाऱ्या ज्युरीज्ना बॉलिवूडचा परिचय नाही असे नाही. ‘गांधी’ सारख्या चित्रपटाला आठ अ‍ॅवॉर्डस् आणि ‘स्लमडॉग’लाही आठ अ‍ॅवॉर्डस् देणाऱ्या ऑस्करच्या ज्युरीज्ना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, असेही म्हणणे शक्य नाही. म्हणजेच ‘स्लमडॉग’मध्ये त्यांना असे काही भावले असावे किंवा त्यांना या चित्रपटाने असे हलवून सोडले असावे की त्यांना एकमताने त्याचीच निवड करणे न्याय्य वाटले. ‘स्लमडॉग’ हा खरे म्हणजे केवळ चित्रपट म्हणून पाहताच कामा नये. तो एक माणसाला मुळापासून हादरवून टाकणारा अनुभव आहे. तो अनुभव फक्त दारिद्रय़ाचा, घाणीचा, दरुगधीचा, भयाणतेचा, दंगलींचा, हलाखीचा, पिळवणुकीचा, माफियाचा, वेश्यावस्तीचा, गुन्हेगारीचा नाही. तर त्या विदारक स्थितीत परिस्थितीशी चार हात करताना ‘फॅन्टसी’द्वारे जीवनातून आनंद आणि आशा निर्माण करण्याचा जीवघेणा संघर्ष आहे. त्या उद्ध्वस्त जीवनाच्या दलदलीतही प्रेमाचे कमळ फुलते आणि बालपण विस्कटलेली मुलेही जगाकडे कुतूहलाने पहात शिकू शकतात आणि ‘शायनिंग इंडिया’च्या झगमगाटाने दिपून न जाता स्वत:च तेजस्वी प्रकाशमान तारे कसे बनू शकतात, याचे ते चित्तथरारक चित्रण आहे. ‘न्यूयॉर्कर’ या न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकाच्या ‘लेटर फ्रॉम मुंबई’ या थेट धारावी परिसरातून पाठविलेल्या वार्तापत्रात लेखिका कॅथरिन बूने हा संघर्ष, ‘स्लमडॉग’च्या निमित्ताने टिपला आहे, तसा भारतातील कोणत्याही पत्रकाराने वा समीक्षकाने साधा प्रयत्नही केलेला नाही. ‘स्लमडॉग’ आपल्याला विषण्ण करतो. कारण आपण आपल्याच रोज दिसणाऱ्या भीषण वास्तवाकडे किती असंवेदनक्षमतेने पाहतो आणि किती क्रूरपणे त्याकडे दुर्लक्ष करतो याची तीव्र जाणीव करून देतो. आपणच या चित्रपटातील खलनायक बनतो आणि धारावीतील प्रत्येक निष्पाप मुलगा/मुलगी तेजस्वी नायक होतात. आपल्या अंतर्मनात शिरून स्वत:च्याच मनातील क्रौर्य आणि घाण विदारकपणे दाखवितानाच या ‘लव्ह स्टोरी’तील रोमान्स आपल्या अंधारलेल्या मनातही इंद्रधनुष्य निर्माण करतो.

No comments: