Monday, March 2, 2009

कॉम्रेड सोमनाथ, लाल सलाम!


सोमनाथ चटर्जी यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व आजकाल राजकारणात दुर्मिळ आहे. चौदाव्या लोकसभेचे सभापती या नात्याने त्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीची आपली ही शाळा चालवली, तिला दाद द्यावी तेवढी थोडीच! सोमनाथदा आता सेवानिवृत्त जीवन जगणार आहेत. खरे तर आणखीही काही वर्षे राजकारणात ते राहू शकले असते, पण कुठे थांबायला हवे, ते त्यांना बरोबर कळले. अनेकांना ते क्वचित कळते, तर काहींना ते कधीच कळत नाही. आणखी काहींना ते कळले तरी वळत नाही. ज्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते सभागृहात नेते होते, त्या पक्षाने त्यांना सभापतिपदाचा राजीनामा द्यायला फर्मावून अणुकराराच्या विरोधात उभे राहायला सांगितले. त्यांनी तसे करायला स्वच्छ नकार देताच पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. तरीही ते लोकसभेच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पदावर राहिले, ती त्या वेळेची आवश्यकता होती. कम्युनिस्टांनी, विशेषत: मार्क्‍सवाद्यांनी हा आपला अपमान मानून चटर्जी यांना सभागृहात आपले काम व्यवस्थित कसे करता येणार नाही, हेही पाहिले, तरीही ते डगमगले नाहीत. एकदोघांनी तर हातवारे करून त्यांच्या संतापाचा पारा चढवला. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्यांनी कम्युनिझम ही काही कोणाची मक्तेदारी नाही, असे स्पष्ट केले. पक्षात राहिलात तरच कम्युनिस्ट, अन्यथा ‘बुझ्र्वा’; असा कुठे काही कम्युनिस्टांचा स्वतंत्र ‘दास’बोध असल्यास माहीत नाही. राजकारणात सध्या असहिष्णुता, फुटीरता, भ्रष्टाचार, झुंडशाही आणि उद्धटपणा यांचा सुळसुळाट झाला आहे, असे सोमनाथदा म्हणाले, ते खरे आहे. यापैकी एखाददुसरा दुर्गुण सोडला तर चौदाव्या लोकसभेत जे होते त्या मार्क्‍सवाद्यांनी बहुतेकांना आत्मसात केले आहे. एखादा विषय सभागृहात उपस्थित करायला नकार मिळाला तर मार्क्‍सवाद्यांकडून गेल्या सात महिन्यात ज्या पद्धतीने तो मुद्दा उपस्थित होत असे, ते लक्षात घेता संसदीय लोकशाहीलाच त्यांचे हे आव्हान आहे की काय, असे वाटू लागे. हाच प्रयोग प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने पाच वर्षे केला. त्यांच्या उद्धटपणाला त्यांचे नेतृत्व आवरही घालू शकत नव्हते, हा दैवदुर्विलास होय! याच पक्षाच्या सदस्यांनी संसदेत कोटी रुपयांच्या नोटा सभापतींपुढे असणाऱ्या टेबलावर ओतल्या. आपल्या संसदीय कारकीर्दीतला तो काळा दिवस होय, असे सोमनाथदा मानतात. विशेष हे, की या आत्यंतिक मूर्खपणाच्या कृतीला अणुकरारावर सरकारला विरोध करणाऱ्या मार्क्‍सवाद्यांनीही आक्षेप घेतला नाही. ही अशी धटिंगणशाही लोकशाहीच्या ज्या सर्वोच्च केंद्रात चालू शकते, त्याकडे पाहून लोकशाही कशी टिकणार, असाच प्रश्न उभा राहू शकतो. प्रश्न विचारायला जिथे पैसे घेतले गेले, तिथे लोकशाहीचे भवितव्य अंधारलेले असेल, असे वाटले, तर ते चुकीचे नाही. चौदाव्या लोकसभेने किती तास काम केले, किती विधेयके संमत केली, कामात किती अडथळे आणले, कामकाजाविना सलग किती दिवस सभागृह बंद राहिले, याविषयी असंख्य गोष्टी पुढे येत आहेत. एक वेळ तर अशी आली, की सदस्यांना उद्देशून सोमनाथदांना सांगावे लागले, की तुम्हाला सरकारच्या तिजोरीतून एक पैसाही मिळता कामा नये. आगामी निवडणुकीत मतदारांकडून तुमचा पराभव केला जाणे अपरिहार्य आहे, तो व्हावा असे वाटते. ते म्हणाले त्याप्रमाणे या गोंधळी मंडळींचा पराभव व्हायला हवा, पण मतदार तेवढा परिपक्व नाही. या अशा सदस्यांवर आपण करत असलेल्या पै न् पैचा हिशेब मागायचा आपल्यालाच अधिकार आहे, हेही त्याला उमजत नाही. ज्यांना उमजते त्यांना त्याची चिंता नसते. पन्नास-साठ टक्क्यांच्या आसपास मतदानात भाग घेणारे प्रत्यक्षात राजकारणाविषयी किती जागरूक असतात, हे गेल्या काही दिवसांमधल्या घटनांवरून जाणवते. दिवसेंदिवस सर्वच पातळय़ांनी आपली पातळी सोडलेली आहे. राजकारणात राहायचे तर मवालीगिरीच करावी लागते आणि भडक भाषेचा अवलंब करून प्रक्षोभ निर्माण करावा लागतो, असाच यातल्या बहुतेकांचा समज दिसतो आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. निवडून येऊ शकणाऱ्याला उमेदवारी, हा निकष एकदा का लावला, की मग तिथे कोण कुठल्या टोळीशी संबंधित आहे, हे तरी कशाला पाहायचे? समाजासमोर आपण काय वाढून ठेवतो आहोत, याचे तारतम्य चढेल आवाजात बोलणाऱ्यांना असत नाही. आपल्या गल्लीत डरकाळी फोडणाऱ्यांना दिल्लीत राहून साधी पिपाणी वाजवता येत नाही, ही यातली खरी मेख आहे. त्यासाठी मौनी खासदारांची जंत्रीच सोमनाथदांनी दिली आहे. बाराव्या लोकसभेपेक्षा तुलनेने तेरावी लोकसभा वाईट, तेरावीपेक्षा चौदावी वाईट, अशीच जर अवस्था असेल तर पंधराव्या लोकसभेकडे कोणत्या अपेक्षेने पाहायचे हा गहन प्रश्न आहे. सोमनाथ चटर्जी हे लोकसभेवर दहा वेळा निवडून आले. गेली ४० वर्षे ते संसदीय लोकशाही अभिमानाने मिरवत आहेत, पण सभापतिपदावर राहून मात्र त्यांना आपण त्याचे पाईक आहोत, हे समाधान घेऊ दिले गेले नाही. सभापती हे निष्पक्ष असतात. त्यांना सर्वाना समान संधी द्यावी लागते. न बोलणाऱ्यांना बोलते करावे लागते. उगीचच भलत्या सलत्या गोष्टी सभागृहात उपस्थित करणाऱ्यांची कानउघडणी करावी लागते. दूरदर्शनच्या थेट प्रक्षेपणात काही गोष्टी दाखवल्या जाऊ नयेत, या विषयीही सूचना द्याव्या लागतात. तथापि जेव्हा यातल्या प्रत्येक गोष्टीचा अतिरेक होतो, तेव्हा त्यांनाही प्रक्षेपण चालू राहू द्या, मतदारांना आपले प्रतिनिधी कसे आहेत ते पाहू द्या, असे सांगावे लागते. (त्यामुळे अर्थातच दूरदर्शनचाही ‘टीआरपी’ वाढतो, हा भाग निराळा.) हादेखील मतदारांच्या लोकशाही प्रशिक्षणाचा एक भाग होता. राजकीय पक्षांपैकी काहींना हे न खपणारे होते. तेव्हा आपण जे काही केले ते लोकशाहीच्या परंपरांची जपणूक करण्यासाठीच केले, हे समाधान आपल्याला लाभले, असे जरी सोमनाथदा मानत असले तरी प्रत्यक्षात जमेच्या बाजूपेक्षा त्याविरोधात वागणाऱ्यांच्या बाजू अधिक प्रबळ आहेत. त्यामुळेच इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला ‘बस्, आता राजकारण पुरे झाले,’ असे म्हणावेसे वाटले. राजकारणात चांगल्या माणसांची वानवा आहे, असे म्हणायचे आणि चांगली माणसे त्या वाटेलाही फिरकणार नाहीत, असे पाहायचे, असा हा दुटप्पीपणाचा खेळ सध्या चालू आहे. तरीही त्यांनी योग्य निर्णय योग्य वेळी घेतला, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असणारे किंवा त्यांच्या वयाच्या आसपास असणारे अनेक नेते आज ना उद्या आपल्याला आणखी उंच, आणखी मोठी खुर्ची मिळेल, या आशेवर जगतात. त्यांचे शरीरही थकत नाही आणि महत्त्वाकांक्षेचे पंखही कधी झडत नाहीत. जनतेत नैराश्याचे वातावरण आहे आणि तुच्छता वाढते आहे, असे ते म्हणाले खरे, पण उद्यापासून सुरू होणाऱ्या निवडणुकीच्या वातावरणात पाहा, निदान काहीजणांचे नैराश्याचे मळभ गळून पडेल आणि निकालानंतरच्या काळात ते पुन्हा एकदा त्यांच्या माथी येईल. कुणी सांगावे, आज अगदी स्तब्ध प्रेक्षकाची भूमिका स्वीकारणारा तरुणवर्ग, नव्या उमेदीचा मतदार वेगळाच चमत्कार घडवेलही! जातिपातीच्या आणि विकृतीच्या चिखलात रममाण झालेल्यांना योग्य तो धडा मिळेलही. त्यासाठी का असेना, सोमनाथदा यांचे हे विचार उपयुक्त ठरावेत. लोकशाहीत सध्या दिसणारे अपूर्णत्व आणि असणाऱ्या त्रुटी दूर करायचा प्रयत्न हा या पुढल्या काळात होईल, हा सोमनाथदांचा आशावाद आहे. त्यांच्यासारख्या विद्वान आणि जो घटना कोळून प्यायला आहे, अशा व्यक्तिमत्त्वाने केवळ संन्यास घेऊन घरी बसणे पसंत न करता मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी मार्गदर्शन करावे. आजच्या तरुणवर्गाला ते उपयुक्त ठरेल. किमानपक्षी पंधराव्या वा सोळाव्या लोकसभेनंतर आपली लोकशाही अधिक सुदृढ बनल्याचे समाधान तरी त्याला मिळेल. निवडणुकीच्या राजकारणात सोमनाथदा पडणार नाहीत, पण ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायची इच्छा आहे आणि ज्यांना ते आपल्या आवाक्यातले नाही, असे वाटते, त्यांना ते दिशा दाखवतील, तर निदान सुसंस्कृतीचा हा बाज अधिक भक्कम होईल.

No comments: