Wednesday, September 29, 2010

स्त्रीप्रश्नाची आंबेडकरी उकल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारकतेर्, असा
केला जातो. मात्र हिंदू कोड बिलाच्या वादात बाबासाहेबांना कायदेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता हे वास्तव सोयीस्करपणे विस्मृतीत ढकलले जाते. जातीव्यवस्थेने मनुष्यत्वही नाकारलेल्या डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांच्या हिताची तरतूद करणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या समर्थनासाठी आपले सारे नैतिक बळ पणाला लावले या एकाच बाबीसाठी भारतीय स्त्रियांनी तरी त्यांच्या ऋणात आजन्म राहायला हवे. स्त्रियांना समान दर्जा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला हवे.

' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड विमेन्स क्वेश्चन्स' हे ललिता धारा यांनी डॉ. एस. आर. कांबळे यांच्या विशेष सहकार्याने संपादित केलेले पुस्तक त्यादृष्टीने उपयुक्त ठरावे. पुष्पा भावे यांनी स्त्रीविषयक प्रश्ान् व चळवळींचा घेतलेला चिकित्सक आढावा, स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व संविधानाच्या चौकटीत बसवण्याचा डॉ. आंबेडकरांचा ध्यास उलगडून दाखवणारे डॉ. सुरेश माने यांचे विवेचन, भारतीय स्त्रीमुक्तीसंदर्भात डॉ. आंंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिमा परदेशी यांनी केलेले विश्लेषण तसेच आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या 'आम्हीही इतिहास घडवला' या उमिर्ला पवार आणि मीनाक्षी मून यांच्या पुस्तकातील वंदना सोनाळकर यांनी अनुवादित केलेला संपादित अंश असे वैचारिक खाद्य या पुस्तकाने वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.

बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य या नात्याने १९२८मध्ये नोकरदार महिलांना प्रसूतीची भरपगारी रजा देणाऱ्या विधेयकाला डॉ. आंबेडकरांनी दिलेले समर्थन, कुटुंबनियोजनाची साधने महिलांनाही उपलब्ध करून द्यावीत असा १९३८मध्येच धरलेला आग्रह या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत संपादक ललिता धारा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीप्रश्ान्विषयक कार्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. नागपूर येथे २० जुलै १९४२ रोजी भरलेल्या 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस विमेन्स कॉन्फरन्स'मध्ये स्त्री-पुरुषांना घटस्फोटाचा समानाधिकार,बहुपत्नीत्वास प्रतिबंध, स्त्री-पुरुषांसाठी कामाच्या जागी अनुकूल सोयीसुविधा असे ठराव संमत करण्यात आले. पुढे व्हाइसरॉयच्या कार्यकारी समितीत मजूर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. आंबेडकरांंनी प्रयत्न केले होते, याकडेही त्या लक्ष वेधतात.

जातीव्यवस्था आणि स्त्रीदास्य यांच्या साहचर्याचा धागा पकडत पुष्पा भावे यांनी योनीशूचितेची संकल्पना, प्रतिलोम विवाहांवरील सामाजिक प्रतिबंध, देवदासी-मुरळ्यांची प्रथा, रस्त्यावरून चालताना ब्राह्माण दृष्टीस पडल्यास शूद स्त्रीने आपला पदर पायघडीसारखा पसरण्याची दक्षिण भारताच्या काही भागांतील प्रथा या समाजव्यवहाराची चिरफाड केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या प्रभावामुळे जानोजी खंदारे, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांसारखे कार्यकतेर् चळवळीला लाभल्याचे त्या नमूद करतात. डॉ. आंबेडकरांनी अन्यायग्रस्ततेचा टाहो न फोडता स्त्रियांना जातीअंताच्या लढाईत सक्रिय व्हावे असे म्हटले.

स्त्रियांना आथिर्क स्वातंत्र्य मिळाले की त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल या आजही प्रभावी असलेल्या तत्कालीन विचारांचा प्रतिवाद डॉ. आंबेडकरांनी कसा केला होता त्याचा संदर्भ डॉ. सुरेश माने यांच्या लेखात आढळतो. 'गरीब घरातल्या स्त्रिया कष्ट करून रोजगार कमावतात; पण त्यामुळे त्या स्त्रियांवरील मर्यादा फारशा हटल्याचे मात्र दिसत नाही' हे डॉ. आंबेडकरांचे निरीक्षण नोंदवून प्रश्ान् स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचा असल्याचे ते म्हणतात. हिंदू कोड बिलावरून घटनासमितीत उठलेले वादळ, अनेकांचेे त्यानिमित्ताने उघड झालेले खरे चेहरे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. तर सतीप्रथा, विधवापण वागवण्याची सक्ती, बालविवाह अशा पराकोटीच्या क्रूर, विषम रूढींना शास्त्रसंमती देणारी मनुस्मृती दहन करण्याचे डॉ. आंबेडकरांचे दूरदशीर् धारिष्ट्य स्त्रियांनी प्रमाण मानायला हवे, असे प्रतिमा परदेशी आपल्या लेखात म्हणतात. पुस्तकाला पूरक परिशिष्टे आहेत.

No comments: