Monday, November 24, 2008

'..तयार झालो!' एका अनामिक कवीची गझल.

"....तयार झालो"

जसा जसा मी जगावयाला तयार झालो,
तसा तसा मी लढावयाला तयार झालो..

सडा असा शिंपलास तू अंगणात माझ्या,
पसा पसा मी भरावयाला तयार झालो..

बघून मागे कशीबशी हासलीस जेव्हा,
कसाबसा मी हसावयाला तयार झालो..

न खंत आभाळ फाटण्याची मला तशी पण,
ससा कसा मी बनावयाला तयार झालो?

विषा, तुला ओळखून होतो तरी कसा रे,
नसा नसा मी भरावयाला तयार झालो?

अखेर तू ही मनातले बोललीस जेव्हा,
ढसा ढसा मी रडावयाला तयार झालो !

तुझी न ही पायधूळ जेव्हा मला कळाले,
ठसा ठसा मी पुसावयाला तयार झालो..

तिने नव्याने दिला जरी तो जुना बहाणा,
असा कसा मी फसावयाला तयार झालो?


-प्रवासी......(एक अनामिक कवी.)

No comments: