Thursday, February 12, 2009

प्रेमाचा उगम मेंदूत, ह्रदयात नव्हे


व्हॅलंटाइन डे साजरा होत असताना, येथील डॉक्टरांनी प्रेमिकांना धक्का दिला आहे. प्रेमाचा आणि ह्रदयाचे जवळचे नाते आहे अशी लोकांची कित्येक शतके समजूत आहे. यालाच धरून गाणी रचली गेली, कथा आणि कादंबऱ्या लिहील्या गेल्या. हार्ट अॅटॅक येण्याशीही काही अतिउत्साही मंडळींनी संबंध जोडला. मेरे दिलके टुकडे हजार हुए, इक इधर गिरा, एक उधर गिरा असेही म्हटले गेले. गुलाबी रंगाचे ह्रदय ही तर प्रेमाची, व्हॅलेंटाइन डेची निशाणी ठरली.

पण आता हे सारे बदलावे लागेल. कारण येथील डॉक्टरांनी पाहणीअंती निष्कर्ष काढला आहे की प्रेम हे मेंदूत उगम पावते. ह्रदयात नव्हे. मेंदूचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनीच हे म्हणणे मांडल्यामुळे त्याचा प्रतिवाद करणेही सोपे नाही. याची प्राथमिक पाहणी उंदरांवर केली गेली. त्या आधारे माणसाच्या मेंदूत प्रेमविषयक भावना कशा असतात याची कल्पना त्यांना आली.

माणसाच्या मेंदूत चार अतिसुक्ष्म भाग आहेत, जेथे प्रेमाचे सकीर्ट सुरू होते. यापैकी व्हेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणजे व्हॅट हा या सकीर्टचा केंदबिंदू आहे. याचा आकार डोळयातील आसवासारखा असतो. नुकत्याच प्रेमात पडलेल्यांना त्यांच्या साथीदाराचे छायाचित्र दाखवले तेव्हा या भागात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून डॉक्टरांनी हा निष्कर्ष काढला आहे. अर्थात दोन दशकांनंतरही एकमेकावर उत्कट प्रेम करणाऱ्यांचाही व्हॅट हाच भाग महत्त्वाचा आहे असे आढळले.

व्हॅटमध्ये तयार होणारे डोपेमिन हे दव्य मेंदूच्या विविध भागांत धाडले जाते. जेव्हा तुम्ही कोणाला पटवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हे दव्य तयार होण्याची आणि ते पाठवण्याची गती वाढते. हे सारे व्यवस्थित घडत असते तेव्हा प्रेम यशस्वी होते, त्यात बिघाड झाला की माणसाच्या हातून काहीतरी भयानक घडण्याचा धोका असतो.

यामुळेच ज्यांचा प्रेमभंग झाला आहे अशांचाही डॉक्टरांनी अभ्यास केला. तेव्हा मेंदूच्या न्यूक्लीअस अॅकमबेन्स या भागातील हालचाली वाढतात असे आढळून आले आहे.मग ते वेडेपिसे होतात. अगदी मादक दव्याचे व्यसन लागलेल्यांना ते न मिळाल्याने नेमके जे होते तेच या प्रेमभंग झालेल्यांबाबत घडते.

यापुढे प्रेमाचे प्रतिक मेंदू दाखवले जाईल की ह्रदयाची जागा कायम राहील? काही असो, उद्या व्हॅलंटाइन डे साजरा करताना ह्रदयावर हात ठेवून प्रेमाच्या आणाभाका घ्या!

No comments: