Thursday, February 12, 2009

व्हॅलेन्टाइन डे

ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे.

स्त्री व पुरुष किंवा तरुण-तरुणी यांना परस्परांविषयी प्रेमभावना निर्माण होणे, ही वास्तविक निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे- जी माणूस टाळू शकत नाही. कारण तो निसर्गाच्या प्रभावाखालीच असतो. या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होणे हे जितके गैर आहे, तितकेच ती संयमाने व्यक्त करण्याचे मार्ग बंद करून एकूणच ती भावना दडपणे, हे त्याहून गैर आहे. "व्हॅलेंटाइन डे'ला मुला-मुलींनी एकमेकांना फूल वा भेटवस्तू देऊन मनातील मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा हा मार्ग निश्‍चितच सभ्य आणि उच्च अभिरुचिदर्शक आहे. अगदी होळीला तरुण-तरुणींनी एकमेकांच्या अंगाला रंग फासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य आहे. ज्या वयामध्ये एकमेकांविषयीच्या आकर्षणाची निसर्गतः सुरवात होते, त्या वयाच्या तरुण मंडळींची ही प्राथमिक गरज आहे. म्हणून तरुण मुलामुलींना हा साधा आनंद घेऊ द्यावा. जर दहशतीने, हिंसेने या भावनेचे प्रकटीकरण आपण बंद पाडू लागलो तर दुसऱ्या मार्गाने चोरून, नजर चुकवीत तरुण मंडळी हे प्रयत्न करीत राहतील. मग ते नैतिक आहे का? पुण्या-मुंबईसारख्या शहरात, जिथे पालक नोकरीमुळे जास्त व्यस्त आहेत तिथे "सहलीला जातो सांगून एक दिवस एक रूम शेअर करून राहणे' असे मार्ग काही जण अवलंबितात. "व्हॅलेंटाइन डे'सुद्धा जर त्यांच्यापासून हिरावून घेतला, तर मग "रूम शेअर' करणे हाच पर्याय तरुणांसमोर राहील आणि ती संख्या वाढीस लागेल. खरे तर मनात असणाऱ्या राग व प्रेम या उद्रेकी भावनांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने निचरा होण्यानेच माणसाची त्या विकारातून मुक्तता होत असते आणि मनःस्वास्थ्य स्थिर राहते. मग असे मानसिक "फिटनेस आणि हेल्थ' जपणारे योग्य व सौम्य मार्ग संस्कृतीच्या सवंग किंवा चुकीच्या कल्पनांनी का बरं रोखून धरायचे? त्यापेक्षा "व्हॅलेंटाइन डे'चे मूळ स्वरूप तसेच ठेवून,

त्याला "भारतीय टच' दिला तर? ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसऱ्याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे "व्हॅलेंटाइन डे. असा तो दिवस आपण भारतीय करून घ्यावा. "व्हॅलेंटाइन डे'ला विरोध असणाऱ्यांनी तो दिवस बंद करण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करावा.

-मंगला सामंत, पुणे

No comments: