Tuesday, February 24, 2009

अतूट नात्याची 'मर्मबंधातली ठेव'

पुण्यातल्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा काव्यसंग्रह वाचून वेडी झालेली आमची पिढी. कविता समजण्याची नुकतिच अक्कल आलेले वय. 'विशाखा'च्या निमित्ताने आपण काही विलक्षण वाचतो आहे. असा माणूस मराठी लिहितो याचेच तेव्हा भाग्य वाटे!

तेव्हा पीडीए (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन) स्थापनेनंतर आम्ही एक-दोन नाटकेही केली होती. वृत्तपत्रात काम करत असताना एकदा शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब पुण्यात आले होते. ते कुठे उतरले आहेत हे कळल्यावर आम्ही त्यांना काहीसे भीतभीतच भेटायला गेलो. योगायोगाने तेव्हा आम्ही त्यांचेच 'दूरचे दिवे' हे नाटक राज्य नाट्य स्पधेर्साठी बसवत होतो. या नाटकाच्या निमित्ताने त्यांची ओळख व्हावी अशी आमची माफक अपेक्षा होती. फारतर ते आम्हाला हाकलून देतील असे वाटले, पण इतका हा मोठा कवी-लेखक असताना कोणतेही आढेवेढे न घेता नाटकाच्या तालमी बघायला यायला तयार झाला! १९५१-५२ सालच्या त्या मंतरलेल्या काळात असून तेव्हा शाहीर अमर शेख कुसुमाग्रजांचा 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' सादर करत होते.

' प्रत्यक्ष नाटक पाहाण्यापेक्षा नाटकाच्या तालमी मला पाहायला आवडतात', असे मिस्कील बोलत ते आमच्या तालमींना येऊ लागले. म्हाताऱ्यांपेक्षा तरुणांबरोबर बोलायला त्यांना आवडतं हे मला सहवासाअंती कळलं. त्या काळात ते गप्पा मारताना भरपूर सिगारेटी ओढत असल्यामुळे आमच्यातील काही सिगारेट पिणाऱ्यांचीही भीड चेपली आणि त्यांच्या आणि आमच्या वयातले ते अंतरही नाहीसे झाले. याचे क्रेडिट अर्थातच पूर्ण तात्यासाहेबांनाच द्यावे लागेल.

तालमी बघितल्यावर आमच्या गप्पा रात्रीच्या चांदण्यात फिरणं हे सर्वच त्यावेळच्या 'मंतरलेल्या दिवसां'चा एक अविभाज्य भाग बनलं. आमच्या नाटकाच्या तालमींना ते कधीच टीका करत नसंत. विचारलं तर हसून उत्तर देत की, 'चांगलं चाललं आहे की!' त्याच काळात आमच्या कॉलेजच्या मुलींनी बसवलेले 'उद्याचा संसार' हे नाटक मात्र अगदीच गचाळ असल्यामुळे त्यांनी त्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं.

दिवसभरातील कामं संपवून 'दूरचे दिवे'च्या तालमींना येणारे शिरवाडकर ही नंतर नित्याचीच बाब बनली. स्पधेर्त ते नाटक साफ पडले असतानाही त्यांनी त्याबद्दल खंत अथवा टीकाही केली नाही इतके ते अलिप्त आणि 'सुखदु:खे समे कृत्त्वा' या गीतेतल्या श्लोकाप्रमाणे आमच्याकडे ते प्रेमाने आणि तेवढ्याच तटस्थपणे पाहात होते.

तात्यासाहेबांची खरी ओळख आणि मैत्री वाढली ती वसंतराव कानेटकरांमुळेच. दोघेही नाशिकचे. वसंतरावांचे पहिले नाटक 'वेड्याचे घर उन्हात'मध्ये मीही काम केले होते. वसंतरावांकडे गेल्यावर ओघानेच शिरवाडकरांकडे जाणे व्हायचेच. तेव्हाही हातातले काम बाजूला ठेऊन ते आमच्याशी मनमुराद गप्पा मारत. पण त्यांची ही वृत्ती घरी येणाऱ्या प्रत्येकासाठी तशीच होती हे आम्हाला नंतर प्रत्ययाला आले.

पुढे अफ्रिकेतून भारतात परत आल्यावर नाटकात करिअर करण्याचे ठरवत असताना पुन्हा शिरवाडकरांचा संबंध आला तो 'नटसम्राट'चे स्क्रीप्ट वाचताना. दी हिंदू गोवा असोसिएशनचे रामकृष्ण नायक यांनी ते मला वाचायला दिले. झपाटल्यासारखा पहिला अंक मी घरी जाऊन आर्ध्या तासात वाचून पूर्ण केला आणि त्यातल्या सुरुवातीच्या मोनोलॉगमुळेच मी इतका इंप्रेस झालो की लगेच (सत्यदेव) दुबेला फोन करून एक अफलातून नाटक वाचत असल्याचे सांगितले. तेव्हा थिएटर युनिटमध्ये मी त्याच्याबराबर काम करत असल्यामुळे तिथे तू सर्वांसमोर वाच असे तो मला म्हणालाही. मी जेव्हा संपूर्ण 'नटसम्राट'वाचले तेव्हा वेडाच झालो!

तो माझ्या प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचा कालखंड होता. एकीकडे मी 'आधे अधुरे' करत होतो तर दुसरीकडे 'काचेचा चंद' आणि 'इथे ओशाळला मृत्यू' ही व्यावसायिक नाटकातून कामेही करत होतो.

' नटसम्राट'चे दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा या नाटकाबद्दल बराच गोंधळ असावा. नाटकातील तिसऱ्या अंकातील अप्पासाहेब बेलवलकराच्या तोंडचा 'कुणी घर देता का घर' हा मोनोलॉग प्रत्यक्षात काढून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यावर मात्र मी थेट तात्यासाहेबांच्या कानावर घातले आणि त्यांच्या आग्रहाखातर तो सीन नाटकात कायम ठेवण्यात यश मिळवले. दारव्हेकरांनी ते अगदी नाईलाजाने मान्य केले! तेव्हाही मुंबईत असले की तात्यासाहेब 'नटसम्राट'च्या तालमींनाही येत आणि नंतर आमच्या गप्पाही रंगत.

कवी म्हणून कुसुमाग्रजांच्या ५० टक्के कविता या अफलातून आहेत, तर ५० टक्के मात्र सामान्य, अर्थात त्याखाली मात्र त्या कधीच गेल्या नाहीत. 'विशाखा' वाचून वेडे झालेल्या कॉलेजच्या वयात मी एक वर्ष गॅदरिंग सेक्रेटरी होतो. ज्या मुलीवर मी प्रेम करत असे तिला एका इव्हेंटमध्ये पहिले बक्षिस मिळाले. सेक्रेटरी असल्यामुळे बक्षिस कोणते द्यायचे हे ठरवण्याचा मला अधिकार असल्यामुळे तिला 'विशाखा' संग्रह दिला. रोमँटिक कवितांच्या या संग्रहामुळे माझ्या प्रेमभावना तिच्यापर्यंत पोचतील असा माझा होरा मात्र चुकला!

तात्यासाहेबांची मैत्री मात्र ते असे पर्यंत टिकली. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच मी त्यांना भेटलो होतो. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर मला तिथे थांबावेसे वाटले नाही, कारण मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहायची असल्यामुळे सर्वच ताटकळले होते. वास्तविक आमच्या या नात्यात उपऱ्या मुख्यमंत्र्यांचे काहीच देणंघेणं नव्हतं!

शिरवाडकरांच्या या अतूट नात्याची 'मर्मबंधातली ठेव' मी आजही जपून ठेवली आहे. किंबहूना त्यांची 'विशाखा' ही माझी आजही एक आवडती कविता आहे!
- डॉ. श्रीराम लागू

No comments: