Tuesday, February 24, 2009

गुलजारची गाणी : कल्पनेच्या भरा-यांकडून वास्तवतेच्या पाय-यापर्यंत

'मुझको कोई अपना दे जा
मुझको कोई सपना दे जा
हल्का फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी...
''सदमा' सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी. एखादं मोरपीस गालावरून फिरावं इतक्या हळुवारपणे हे शब्द आपल्या मनाला मोहरून टाकतात. गुलजारच्या अशा मुलायम शब्दांबाबत बोलण्यासाठीही आपल्याकडेच शब्द शिल्लक राहत नाहीत.

गुलजार म्हटलं की कानात अनेक गाणी रूंजी घालू लागतात. एरवी फिल्मी गाणी आपल्याला पटकन आठवत नाही. पण 'थोडीसी बेवफाई'मधलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं 'हजार राहे मूड के देखी, कही पे कोई सदा न आई...' हे गाणं एकदा रेडिओवर ऐकलं आणि प्रश्न पडला... इतक्या वर्षांनंतरही इतकं ताजं का वाटतं? काही उलगडाच होईना. मग कधीतरी या गाण्याचे गीतकार गुलजार असल्याचं ऐकलं आणि या ताजेपणाचं रहस्य लक्षात आलं. गाणं कधीही जुनं वाटणार नाही, असे हुकमी शब्द वापरण्याचं सामर्थ्य गुलजारकडे आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर 'आंखे भी कमाल करती है पर्सनल से सवाल करती है...'असं गुलजार सहज लिहून जातो. त्यातला 'पर्सनल से सवाल' आपल्याला खटकतही नाही. आपल्या रोजच्या बोलण्याच्या भाषेत अशा अनेक शब्दांचा वापर सहज करत असतो. त्यामुळेच अशी रचना शब्दही आपल्याला परकी न वाटता आपलीच वाटू लागते.

हिंदी सिनेमातल्या गीतकारांच्या गर्दीत गुलजार नेहमीच वेगळा वाटतो. त्याच्या गाण्यातले शब्द, प्रतिमा, उपमा कधीही परग्रहावरच्या वाटल्या नाही. प्रत्यक्षात त्याच्या गाण्यातल्या अनेक प्रतिमा या खरं तर आपल्या कल्पनेपलीकडच्या...आवाक्यापलीकडच्या. पण त्या इतक्या सहजतेने वापरलेल्या असतात की आपण नकळत हळवं होऊन जातो. 'एकसो सोला चांद की राते...' असं म्हणत गुलजार उपमांच्या आकाशात नेतो आणि मग अचानकपणे त्याच्या पुढच्या 'और तुम्हारे कांधे का तील' या शब्दांतून तो आपल्याला उपमांच्या आकाशातून अलगद जमिनीवर आणून सोडतो. वास्तव आणि कल्पनेच्या जगात गुलजार अतिशय सहजतेने वावरतो. पण आपण मात्र कधी त्याच्या वास्तवात जमिनीवर वावरतो, तर कधी त्याच्या रोमँटिझम'च्या आकाशात फिरू लागतो... अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला गुंतवून ठेवण्याची, बंदिस्त करण्याची ताकद केवळ गुलजारमध्येच आहे.

'अक्स' नावाच्या सिनेमात 'बंदा ये बिंदास है'असं अगदी आपल्या जमिनीवरच्या माणसांचं गाणं गातो, तर 'ये रात' हे गाणं ऐकलं की आपण कुठल्या जगात आहोत, हे कळायला मार्गच राहत नाही. दोन्ही गीतं एकाच माणसाने लिहिली आहे. विश्वास ठेवायला थोडं अवघड जातं. गुलजारच्या तरल कवितांच्या प्रेमात पडणारी माणसं खूप सापडतील. पण तोच गुलजार जेव्हा 'कजरा रे कजरा रे' लिहून जातो, तेव्हा अरे हे काय लिहून बसलाय गुलजार, असा प्रश्न पडतो. पण गुलजारच्या कवितांमधले एकेक शब्द म्हणजे एक वेगळी कविताच. अशा वेळी गुलजारने 'गोली मार भेजे मे' लिहिणं भयाणच वाटतं. सिनेमासाठी गाणी लिहणारा म्हटलं की तो शायर राहत नाही. हव्या त्या चालीवर शब्द बांधून देणारा गीतकार ठरतो. जेव्हा सिनेमाला चांगली पटकथा, मेलोडिअस संगीत असायचं, अशा वेळी गुलजारच्या शब्दाला वेगळीच चमक यायची. 'आंधी'मधलं 'इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते...' किंवा 'मौसम'मधलं 'दिल ढुंढता है फिर वोही, फुरसत के रात दिन...' ऐकताना हे फिल्मी गीत आहे, असं म्हणण्याचा कोणी मूर्खपणा करणार नाही.

पण गुलजार मात्र सिनेमात स्थिरावताना तरुणाईची भाषा बोलायला लागला. तरल, काव्यात्मक शब्दांच्या जंजाळात अडकण्यापेक्षा साध्या शब्दातून बोलायला लागला. त्यामुळेच आजही गुलजारच्या गाण्याला आपण जुन्या जमान्यातला कवी, गीतकार म्हणू शकत नाही. गुलजारच्या कवितेची ओढ वाटायचं आणखी एक कारण म्हणजे हा माणूस समाजापासून इतका तुटलेला, वेगळा आहे, असं काही वेळा वाटतं. पण मग याला आपल्या आजूबाजूला काय घडतंय, हे इतक्या बारीकसारीक बारकाव्यानिशी कसं काय कळतं, असा प्रश्नही आपल्याला छळत राहतो. याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आपण गुलजारच्या कवितेत हरवून जातो.

सिनेमात रूळलेली माणसं सिनेमाशिवाय कशाचा विचार करत नाही. त्यांच्या माणूस म्हणून सिनेमाखेरीज कोणत्याच संवदेना शिल्लक राहत नाहीत. पण गुलजार कवी म्हणून संवेदनशील आहे, तसाच तो पटकथा लेखक, संवादलेखक म्हणूनही आहे. 'साथिया' सिनेमातल्या एका गाण्यात, 'दोस्तो से झुठीमुठी दुसरो का नाम लेके तेरी मेरी बाते करना' किंवा 'सत्या' सिनेमात 'सारा दिन रस्ते पे खाली रिक्षेसा पिछेपिछे चलता है' इतकं वास्तववादी लिहतो. पण याच सिनेमातल्या 'बादलों से काट काट के कागजो पे नाम जोडना' असं लिहून गुलजार एकदम स्वप्नाळू उपमा देऊन जातो. किंवा अनेकदा आपण कधी त्यांनी वापरलेल्या उपमांनी थक्क होतो. तरी 'गीला पानी', 'कांच के खाब', 'कोहनी के बल पे चलता चांद' अशा उपमा सहजपणे त्याच्या फिल्मी गाण्यात येऊन जातात.

'माचिस'पासून हा गीतकार तरुणाईच्या भाषेत बोलू लागला. 'कजरा रे'ने तर विशीतल्या तरुणाची भाषेत तो बोलला. 'माचिस'मध्ये पंजाबमधल्या तरुणाईची भाषा, संवेदना तो इतक्या अचूकतेने कसं ओळखू शकतो, याचं आश्चर्य वाटतं. गुलजारने मुलीच्या, बोस्कीच्या जन्मानंतर मुलांसाठी गाणी लिहिली. त्यातही मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला होता. बहुदा स्वत:च्या मुलीबरोबर तोही तरुण होत गेला. त्याच्या कवितांमध्ये नव्या प्रतिमा, उपमा आल्या. त्याच्या कवितेतल्या गद्यापेक्षाही त्यातली गेयता वाढत गेली. 'छई छप्पा छई, छप्पा के छई' गाण्यातला ऱ्हिदम त्याच्या तरल शब्दांपेक्षाही जास्त गुणगुणायला लावतो. त्यामुळेच हळूहळू गुलजार तरुणांच्या मनात सामावला.

'दिलसे रे' गाणं ए. आर. रहमान आणि शाहरूख खानचं. या दोघांच्या तरुणाईत गुलजारचे शब्दही तितक्याच ताकदीने तरुण झाले होते. 'चल, छय्या छय्या' म्हणताना आपण नकळत कधी ताल धरतो ते कळत नाही. पण 'ऐ अजनबी, तू भी कभी आवाज दे कहीं से...' म्हणताना त्यातला शायर अजूनही कायम आहे, हे सांगून जातो. 'घर' या सिनेमासाठी गुलजारने एकाहून एक सरस गाणी लिहिली. 'कांच के खाब है, आंखो में चुभ जायेंगे', असं लिहणारा गुलजार 'बोतल से एक रात चली है, खाब उडाके रात चली है', असंही म्हणतो. त्यामुळेच तो अजब रसायन असल्याची खात्री पटून जाते.

गुलजारच्या प्रेमात पडण्यासाठी आणखी एक कारण असतं ते म्हणजे तो आजच्या जगात सहजपणे वावरतो. रेखाच्या 'खुबसूरत'चे डायलॉग गुलजारने लिहिले. ते डायलॉग त्या काळाला साजेसे, हृषिदांच्या सिनेमाला शोभणारे होते. पिढी बदलली, समाजाची भाषा बदलली आणि ते लक्षात घेऊनच नव्या 'खुबसूरत' सिनेमात गुलजार 'ऐ शिवानी' असं गाणं लिहितातो. याच सिनेमात 'बडी खुबसूरत हो', असं म्हणताना, बडी ताजा खबर है,के तुम खूबसूरत हो, ये बिखरी लटे है इन्हे चेहरे पे गिरने दो असं रोमँटिक गाणं म्हणतो. तसं 'गश खाके हो गया निहाल कुडीए' असं डिस्कोथेक गाजवणारं गाणंही तो लिहून जातो. आजच्या कॉलेजगोअरची भाषा बोलतो. त्याचवेळी 'रॉकफोर्ड' सिनेमात 'आसमां के बाद शायद और कोई आसमां होगा... असं म्हणून पुन्हा एकदा शायर होतो. 'साथिया'च्या निमित्ताने गुलजार पुन्हा एकदा तरुण झाला. 'बंटी और बबली'मध्ये 'चुपके से ...' आणि दुसरीकडे 'धडक धडक' अशी गाणी ऐकली की गुलजार तरुणांच्या दिल की धडकन का बनला ते जाणवतं.

तो नुसताच कवी म्हणून तरुण झालेला नाही तर संवादलेखक म्हणूनही त्याच्या लिखाणात ताजेपणा दिसतोय.'साथिया'त विवेक ओबेरॉय राणी मुखर्जीला प्रपोज करताना 'आय लव यू' म्हणतो तेव्हाचा डायलॉग आठवा.
ती : फिर क्या?
तो पुन्हा : आय लव यू
मेरे लिए क्या कर सकते हो?
कुछ भी इस ट्रेन से कूद जाओगे?
हां, ट्रेन रूकतेही...
प्रेमात पडलेल्या तरुणाला इतक्या अचूकपणे ओळखणारा गुलजार आपल्याला चकीत करतो. 'बंटी और बबली'मध्ये उत्तर भारतातल्या अवधी भाषेचा लहेजा दाखवणारा गुलजार 'ओंकारा'मध्ये यूपीतली संस्कृती शब्दाशब्दातून आपल्यासमोर आणतो. 'बीडी जलई ले जिगरसे पिया जिगरमा बडी आग है' ही ओळ पटकन भुरळ घालते. अगदी 'रात भर छाना छाना रे नमक इश्क का' म्हणताना हा शब्दांचा अतिरेक आहे, असं वाटत नाही.
किंबहुना प्रेमाच्या वा इश्काच्या गोडव्याप्रमाणेच त्यातला नमकीनपणही पुढे येतो.

गुलजार काळाप्रमाणे, नव्या पिढीप्रमाणे बदललाय. पण त्याच्या जुन्या कवितांमधला, गाण्यांमधला फ्रेशनेस मात्र अजिबात कमी झालेला नाही. म्हणूनच तर तो आजच्या पिढीला जितका आपला वाटतो, तितकाच आधीच्या पिढ्यांनाही. मग ती पिढी ग्रामीण भागातली असो वा शहरी..!

No comments: