Tuesday, March 24, 2009

डॉ. भालचंद्र मुणगेकरमुणगेकरांना बोलायला खूप आवडतं आणि त्यांचं बोलणंही कायम ऐकत राहावं, असंच असतं. त्यातून कायम काही तरी नवा मुद्दा, नवा विचार सापडत जातो; शिवाय त्यांच्या आठवणी, अनुभव आणि सतत भविष्याविषयीचा विचार यामुळे त्या बोलण्यातून आपलं संचित अधिकाधिक समृद्ध होत जातं. सहा दशकांच्या आयुष्यात मुणगेकरांना नाना प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. हे सारेच अनुभव सुखद होते, असं मुळीच नाही. वास्तवाच्या पातळीवरील अनेक संघर्षांना तोंड देतानाच, वैचारिक वादळांतूनही त्यांना पुढे जावं लागलं. पण त्यांच्या जीवननिष्ठा प्रखर होत्या आणि उदारमतवादी लोकशाहीवादाची बैठक पक्की होती. त्यामुळे ते कधीही विचलित झाले नाहीत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे समाजाच्या तळागाळातल्या 'आम आदमी'शी कोकणातल्या बालपणातच जुडलेली नाळ आज ते दिल्लीच्या नियोजन आयोगाच्या कचेरीत जाऊन बसले, तरी कायमच आहे.

मुणगेकर म्हणजे डॉ. भालचंद्र मुणगेकर.

रिर्झव्ह बँकेतील कार्यक्षम अधिकारी. अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि प्राध्यापक. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि आता नियोजन आयोगाचे सदस्य. पण हे सर्व करत असताना कृतिशील कार्यकर्ता म्हणून चळवळीशी असलेलं त्यांचं नातं कायमच आहे. हे त्यांचं नातं नेमकं कसं जुळलं?

कोकणातल्या अठराविश्वं दारिद्याचे चटके सहन करून मुणगेकर शिक्षणासाठी मुंबईत आले आणि परळच्या नवभारत विद्यालयात दाखल झाले. तिथली चार वर्षं हा त्यांच्या जीवनातला बहुधा सर्वात सुखद काळ असावा. शरद चित्रे, बा. बा. ठाकूर आणि लीला आवटे या तेथील शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा मुणगेकरांच्या आयुष्यावर दूरगामी स्वरूपाचा परिणाम झाला खरा; पण त्यांच्या जीवनाला जी काही वैचारिक बैठक प्राप्त झाली, ती शिवाजी पार्कच्या अॅड. लक्ष्मण पाटलांच्या 'कृष्णकुंज' वास्तूच्या गच्चीवरच्या गप्पांतूनच.

ते १९६०चं दशक होतं. जगभरात विद्यार्थी चळवळी जोरात होत्या आणि महाराष्ट्रातही मेडिकल कॉलेजांतील कॅपिटेशन फीच्या विरोधात पुण्यातील कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, अनिल अवचट असे काही तरुण आंदोलन उभं करू पाहत होते. प्रा. राम बापट हे या गटाचे 'आयडलॉग' होते. मुळच्या 'समाजवादी युवजन सभे'शी संबंधित असलेल्या या गटाशी सिद्धार्थ कॉलेजच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणारे मुणगेकर मुंबईतील आपल्या मित्रपरिवाराबरोबर जोडले गेले होते. राम सातपुते, कमलाकर सुभेदार, अरुण ठाकूर, गोपाळ राणे, हुसेन दलवाई, हेमंत गोखले, गोपाळ दुखंडे अशा साऱ्या समाजवादी विचारांच्या गोतावळ्यात वावरणारे मुणगेकर मग उरळी कांचनला 'युवक क्रांती दला'ची १९६७-६८ मध्ये स्थापना झाली तेव्हा तिथं नुसते उपस्थितच नव्हते, तर त्यांचा त्या संघटनेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग होता.

'युक्रांद'ची स्थापना झाली आणि लक्ष्मण पाटलांच्या गच्चीवर दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी नियमित बैठका सुरू झाल्या. तोपावेतो मुणगेकरांना रिर्झव्ह बँकेत नोकरी लागलेली होती. बुधवारी युक्रांदची बैठक असायची आणि शनिवारी अभ्यासवर्ग. गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, आचार्य एस. के. लिमये, मे. पुं. रेगे. नलिनी पंडित, वसंत पळशीकर, डॉ. सत्यरंजन साठे, हमीद दलवाई असे अनेक लोक या गच्चीवरच्या गप्पा रंगवून गेले आणि त्यातूनच मुणगेकरांसारख्या अनेकांच्या आयुष्याला वैचारिक बैठक लाभत गेली. ही बैठक समाजवादाची होती, तशीच उदारमतवादाचीही. संसदीय लोकशाहीवरचा विश्वास हा तर या विचारप्रणालीचा गाभा होता. पुढे जाती व अस्पृश्यतानिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षवाद, लोकशाहीवाद आणि मानवतावाद ही पंचसूत्रे मुणगेकरांनी आपल्या जीवनात कसोशीनं जपली, त्याचं मूळ हे या गच्चीवरच्या गप्पांवरच्या संस्कारात होतं. १९६७-६८ पासून थेट १९८२ पर्यंत हे गच्चीवरचं ज्ञानसत्र अखंड सुरू होतं. 'युक्रांद'ची चळवळ ही आपल्या आयुष्याच्या परिवर्तनातील अत्यंत महत्त्वाची घटना असल्याचं मुणगेकरांनी अनेकदा नमूद केलं आहे.

पुढे त्यांनी रिर्झव्ह बॅकेची नोकरी सोडून प्राध्यापकी पत्करली. हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक टनिर्ंग पॉईंट. ते साल होतं १९७४. मुणगेकरांचा पगार तेव्हा निम्म्यानं कमी झाला होता. इतर महाविद्यालयांमध्ये थोडा अधिक पगार मिळण्याची शक्यता असतानाही मुणगेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील आंबेडकर कॉलेजमध्ये जाणं पसंत केलं. मुणगेकरांचा पहिला लेखही त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता. बाबुराव बागुल यांनी सुरू केलेल्या 'आम्ही' या अंकात 'दलित चळवळ : अनुभूती आणि सहानुभूती' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात मुणगेकरांनी या चळवळीचा अत्यंत तटस्थ आढावा घेतला होता. ते असो. पण खरं तर मुणगेकरांसारखा शालेय जीवनात चमकणारा हुषार मुलगा पुढे इंजिनिअरिंग वा मेडिकलला न जाता अर्थशास्त्राचा विद्याथीर् कसा झाला, याचाही एक किस्सा आहे. नवभारत विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी चित्रे सरांनी 'आज आपल्या देशाला चांगल्या अर्थतज्ज्ञांची गरज आहे...' असं एक वाक्य उच्चारलं. त्या एका वाक्यानं प्रभावित होऊन मुणगेकर अर्थशास्त्राकडे वळले. त्यातूनच पुढे बँकिंगऐवजी प्राध्यापकीचा विचार त्यांच्या मनात आला असणार. १९८२ मध्ये मुणगेकरांनी युजीसीची फेलोशिप स्वीकारून पीएच. डी.चं काम सुरू केलं, तेव्हा त्यांनी निवडलेल्या विषयाचं बीजही युक्रांदच्या चळवळीतूनच त्यांच्या मनात रुजलं होतं. १९७०च्या दशकात शरद जोशी यांचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं, तेव्हाच ते केवळ बड्या शेतकऱ्यांच्या हिताचं आंदोलन आहे, असा विचार रंगा राचुरे आणि सांदिपन बडगिरे मांडू पाहत होते. त्यातूनच मुणगेकरांचा पीएच. डी.चा विषय उभा राहिला. तो होता 'अॅग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी'.

एकीकडे गच्चीवरच्या गप्पा रंगत असतानाच, मुणगेकरांच्या जीवनावर आणखी एक संस्कृती प्रभाव पाडू पाहत होती. ती होती समाजवादी परिवारात 'चुनाभट्टी संस्कृती' या नावानं ओळखली जाणारी संस्कृती. चुनाभट्टीला देवी गुजर या समाजवादी कार्यर्कत्याचं घर होतं. मुंबईतल्या सातपुते, ठाकूर, दलवाई अशा मुणगेकरांच्या काही मित्रांनी जगन्नाथ कोठेकर, गिरीश नावेर्कर अशा आणखी काही युवकांसोबत देवी गुजर यांच्या घरात एक अड्डा उभा केला होता. खरं तर तिथं एक कम्युनच काही काळ चाललं. मुणगेकर गच्चीवरल्या गप्पांप्रमाणे या कम्युनचे आजीव सदस्य कधीच नव्हते; पण कम्युनला दिलेल्या दोन-चार भेटीतील चर्चांचा प्रभाव आजही त्यांच्या बोलण्यातून जाणवतो.

पुढे मुणगेकर १९९९ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तेव्हा लौकिक अर्थानं या विद्यापीठाला १४३ वर्षांनंतर पहिला दलित कुलगुरू लाभला होता आणि तसा उल्लेखही जाहीरपणे झाला होता. पण मुणगेकरांचं दलित असणं, हा खरं तर निव्वळ योगायोग होता. तरीही तो उल्लेख झालाच. खरं तर 'दलित' आणि आचार-विचारांनी पूर्णपणे आंबेडकरवादी असलेले मुणगेकर हे दलित चळवळीचे सक्रिय कार्यकतेर् न होता, 'युक्रांद'चे कार्यकतेर् होणे, हे एका अर्थानं त्यांनी दलित चळवळीच्या कक्षा ओलांडून पुढे टाकलेलं पाऊलच होतं. काही दलितांच्या मनात तसा सलही होता. १९७२ मध्ये पुणे जिल्ह्यातील 'बावड्याच्या बहिष्कारा'चं प्रकरण गाजलं आणि त्यातून 'दलित पँथर'ची चळवळ उभी राहिली. त्यानंतर १९७९ मध्ये मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या प्रश्ानवरून झालेल्या आंदोलनात मुणगेकरांनी स्वत:ला झोकून दिलं, यात नवल नव्हतं. इतर अनेक कार्यर्कत्यांबरोबरच मुणगेकरांनाही तेव्हा अटक झाली होती आणि विसापूरच्या जेलमध्ये आठ दिवस काढावे लागले होते. दलितांच्या मनातली मुणगेकरांविषयीची अढी दूर झाली, ती बहुधा त्यानंतरच.

मुणगेकर स्वत: हा तुरुंगवास ही एक अपूर्व आणि आत्मसन्मानाची घटना मानतात. लौकिक जीवनातील अनेक मानसन्मान त्यांना आतापावेतोच्या सहा दशकांच्या आयुष्यात लाभले असले, तरी मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी झालेला तुरुंगवास हा त्याहीपेक्षा मोठा आत्मसन्मान ते समजतात, एवढी एकच बाब त्यांची जीवननिष्ठा स्पष्ट करण्यास पुरेशी आहे...

No comments: