Sunday, March 1, 2009

थॉमस वॉटसन(सिनीयर) आणि आईबीएमची सुरुवात....

अनेक चढउतार करत जिद्दीनं पुढं जाण्याच्या थॉमस वॉटसनच्या इच्छाशक्तीनं या प्रवासात त्याला मासे विकण्यापासून ते कारावासाच्या शिक्षेपर्यंतचे चढ पार करायला लावले. पण हळूहळू अनुभवातून शिकत, विक्रीचं तंत्र आत्मसात करत एनसीआर, सीटीआर आणि पुढे सीटीआरच्याच आयबीएम अशा बडय़ा कंपन्यामध्ये त्यानं उच्चपद प्राप्त केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचं नाव झळकू लागलं. ‘सेल्स ओरिएन्टेड दृष्टीकोन ठेवावा’ हे त्याचं ब्रीदवाक्य
१७ फेब्रुवारी १८७४ या दिवशी न्यूयार्कमध्ये थॉमस वॉटसन (सिनीयर) जन्मला तेव्हा त्याचा संगणकांशी काहीही संबंध यायची सुतराम शक्यता नव्हती! त्याचे वडील शेतकरी होते. थॉमसला लहानपणी दम्याचा विकार होता. तसंच तो बुजरा असल्यानं एकलकोंडा होता. वयाच्या अठराव्या वर्षी त्यानं मास्तरकीचा व्यवसाय पत्करला, आणि तो एकाच दिवसात सोडूनही दिला!
मग हिशेब आणि व्यवस्थापनाच्या संदर्भातला एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानं आठवडय़ाला सहा डॉलर्सचा पगार असणारी कारकुनाची नोकरी केली; पण ती एका आठवडय़ाचा पगार घेण्याइतका काळही केली नाही! त्याचं मन अशा प्रकारच्या कामांमध्ये लागेना. आता त्यानं पियानो आणि माऊथऑर्गन विकायची आधीपेक्षा दुप्पट पगाराची नोकरी धरली. त्यानंतर थोडे दिवस त्यानं कपडे शिवायची यंत्रं विकली. त्यावेळी एके रात्री खूप दारू पिऊन नशेत असताना त्याचे शिवणयंत्रांचे नमुने, एवढंच काय पण घोडय़ासकट घोडागाडी हे सगळं चोरीला गेलं आणि त्याबरोबर त्याची नोकरीही गेली!
यानंतरही त्यानं एक-दोन छोटे-मोठे उद्योगधंदे करून पाहिले. त्यापैकी एक म्हणजे मांस विकणं हाही होता! तोही बंद पडला! त्या


व्यवसायात असताना त्यानं एनसीआरचं एक यंत्र विकत घेतलं होतं. ते वापरता वापरता त्याचं त्या यंत्राविषयीचं कुतूहल जागृत झालं. किंबहुना ते यंत्र बनवणाऱ्या कंपनीत नोकरी मिळवायचा निर्धार त्यानं केला. या काळात तो रात्री एका दुकानाच्या तळघरात अंगाचं मुटकुळं करून झोपत असे! अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर त्याला एनसीआरचे दरवाजे खुले झाले. लाज वाटून न घेता एनसीआरच्या अनेक मिनतवाऱ्या केल्या आणि सारखं नोकरी मिळवण्यासाठी तगादा लावला! तिथं रेंज नावाच्या माणसाच्या हाताखाली त्यानं उमेदवारी केली. सुरुवातीला दहा दिवस फिरूनही तो एनसीआरचं एकही यंत्र विकू शकला नाही. समोरच्या माणसानं ‘मला हे विकत घ्यायचं नाहीये’ असं म्हटलं की काय करायचं हे त्याला समजत नसे. मग रेंज त्याला त्याच्याबरोबर घेऊन गेला आणि त्यानं वॉटसनला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. समोरचा माणूस ‘मला तुमचं यंत्र नको’ असं म्हणताच रेंज सरळ विषय बदले. इकडचं तिकडचं बोले, आणि मग हळूच त्या माणसाला ‘तुम्हाला हे यंत्र नकोय हे मला माहिती आहे; कारण ते हवं असतं तर तुम्ही सरळ आमच्या कार्यालयात येऊन ते विकत घेतलं असतं’ असं म्हणे. मग त्यानं ते यंत्र का घेतलं पाहिजे यावर तो अगदी थोडय़ा शब्दांमध्ये प्रभावी भाषण ठोके की बहुतेक लोक त्याला बळी पडायचेच!
हे सगळं वॉटसन शिकला. पुढच्या तीन वर्षांमध्ये त्यानं विक्रीच्या विभागात घसघशीत यश मिळवलं आणि एनसीआरचा तो ‘स्टार सेल्समन’ बनला!
१९०३ साली एनसीआरचा प्रमुख जॉन पॅटर्सननं वॉटसनला कंपनीच्या ओहायोमधल्या डेटन इथल्या मुख्यालयात बोलावून घेतलं. पॅटर्सननं वॉटसनला ‘वॉटसन्स कॅश रजिस्टर अ‍ॅण्ड सेकण्ड हॅण्ड एक्स्चेंज’ नावाची कंपनी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये काढून दिली. या कंपनीचं काम एकच होतं. एनसीआरची आणि एनसीआरच्या सगळ्या प्रतिस्पध्र्याची ‘सेकण्ड हॅण्ड यंत्रं विकत घ्यायची आणि ती इतक्या स्वस्तात विकायची, की ‘सेकण्ड हॅण्ड’ व्यवसाय करणारी मंडळी या धंद्यातून पार उठलीच पाहिजेत! शिवाय प्रतिस्पर्धी कंपन्यांची यंत्रं जर खराब असतील तर ती मुद्दामहून तो आणखीनच कवडीमोलात विकायचा. ती खराब असल्यानं मग लोक त्या कंपन्यांवर नाराज होत. त्यावर ‘उपाय’ म्हणून मग त्यांना एनसीआरची चांगली आणि मुख्य म्हणजे ‘फर्स्ट हॅण्ड’ यंत्रं विकत घ्यावी लागत! यामुळे ‘सेकण्ड हॅण्ड’ यंत्र विकणाऱ्या कंपन्यांचं दिवाळं निघून त्या कंपन्या विकायला काढल्या जायच्या. असं करत करत त्यानं सगळ्या ‘सेकण्ड हॅण्ड’वाल्यांचं नामोनिशानच मिटवलं! १९०८ साली वॉटसनची ‘कंपनी’ एनसीआरमध्ये विलीन करण्यात आली. अर्थातच वॉटसनला बढती वगैरे मिळाली, पण त्यानं पॅटर्सनचं म्हणणं ऐकून जे काम केलं होतं ते बेकायदेशीर होतं याची त्याला कल्पना नव्हती. प्रतिस्पध्र्याना अशा तऱ्हेनं जेरीला आणून नेस्तनाबुत करणं हे त्या काळातसुद्धा अवैध असे. १९१० साली एनसीआरची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ‘अमेरिकन कॅश रजिस्टर कंपनी’नं एनसीआरवर अवैध आणि एकाधिकारशाही मार्गाचा अवलंब केल्याचा खटला भरला गेला. १९१३ साली पॅटर्सन, वॉटसन आणि एनसीआरच्या अन्य उच्चपदस्थांना दंड आणि कारावासाची शिक्षा झाली. पॅटर्सननं वॉटसनकडून ‘या कामात मी स्वखुषीनं सहभागी झालो होतो, आणि त्यासाठी पॅटर्सनंन माझ्यावर कोणताही दबाव आणला नव्हता’ असं लिहून मागितलं. पण वॉटसननं असं करायला नकार दिला. त्यावर त्यांची वादावादी झाली. शेवटी वॉटसनची ‘जनरल मॅनेजर’ या पदावरून आणि नोकरीवरून हकालपट्टी झाली. काही काळानं वॉटसनचा कारावासाच्या शिक्षेविरुद्धचा अर्ज मंजूर होऊन ती शिक्षा टळली. चित्रपटात दाखवतात तशा बदल्याच्या भावनेनं एनसीआरपेक्षा मोठी कंपनी काढायचा चंगच वॉटसननं बांधला होता.
हर्मन होलेरिथनं जनगणनेचं काम करण्यासाठी आपलं यंत्र बनवून ते विकण्यासाठी ‘टॅब्युलेटिंग मशीन’ कंपनी काढली होती. सुरुवातीला चांगला धंदा झाल्यावर त्यानं १९०० साली अमेरिकन जनगणनेचं काम करण्यासाठी खूप पैसे मागितल्यामुळे वैतागून संबंधित अधिकाऱ्यांनी ते कंत्राट दुसऱ्यालाच दिलं. १९११ साली आपली कंपनी आता आर्थिक अडचणींमध्ये सापडली आहे हे लक्षात आल्यामुळे होलेरिथ आपली कंपनी चार्ल्स फ्लिंट नावाच्या उद्योगपतीला बऱ्याच अटी घालून विकायला तयार झाला. फ्लिंटनं त्याच सुमाराला आणखी दोन कंपन्या विकत घेऊन त्या सगळ्यांची ‘कम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्डिग’ (सीटीआर) नावाची एकच कंपनी बनवली. पण ती कंपनी लवकरच गलितगात्र अवस्थेत आल्यानं तिचं बूड स्थिर करण्यासाठी फ्लिंटला कुणी तरी हवं होतं. त्याच सुमाराला वॉटसन असं काही तरी हुडकतच होता! अशा रीतीनं सीटीआरमध्ये वॉटसन ‘जनरल मॅनेजर’ या पदावर रुजू झाला. त्या वेळी सीटीआर कंपनी घडय़ाळं, वजनकाटे आणि मुख्य म्हणजे पंचकार्डाचं यंत्र अशा गोष्टी बनवायची. वॉटसनला या जबाबदारीसाठी वर्षांला २५,००० डॉलर्सचा पगार, सुमारे ३६,००० डॉलर्स किंमतीचे १२०० समभाग, आणि कंपनीच्या नफ्यातला पाच टक्के वाटा मिळणार होता. पंचकरड म्हणजे माहिती साठवण्यासाठी वापरली जाणारी जाड पुठ्ठय़ांची करड. या कार्डावर यंत्रानं भोकं पाडायची सोय असते. भोकं पाडणं म्हणजेच माहिती साठवणं अशी कल्पना त्यात वापरली जाते.
त्या कंपनीत वॉटसननं पॅटर्सनकडून शिकलेली मार्केटिंगची तत्त्वं अमलात आणायला सुरुवात केली. सीटीआरनं बाकी उत्पादनांवरचा भर कमी करून त्यांची पंचकार्र्डाची यंत्रं त्यांच्या धंद्याचा केंद्रबिंदू बनवावा असं त्याचं मत होतं. विक्री विभागातल्या मंडळींनी एकदम टापटीप राहावं, दारू पिऊ नये वगैरे नियम त्यानं आणले. पॅटर्सनच्या धर्तीवर विक्रीच्या रकमेमधला काही भाग जास्त धंदा आणणाऱ्या लोकांना ‘कमिशन’ म्हणून द्यायची प्रथा त्यानं सुरू केल्याने ती मंडळी अजून उत्साहानं काम करू लागली. एकूणच कंपनीच्या सगळ्या विभागांनी ‘सेल्स ओरिएन्टेड’ दृष्टीकोन ठेवावा असं त्याचं ब्रीदवाक्य होतं. तीन वर्षांमध्ये त्यानं कंपनीच्या विक्रीचा आकडा दुप्पट करून दाखवला! आपल्या कर्मचाऱ्यांनी कधीही गैरवर्तन करू नये, नेहमी आदबीनं बोलावं वगैरे नियमही त्यानं आणले. गंमत म्हणजे संतापला की तो स्वत: या नियमांना गुंडाळून ठेवत असे!
१९२४ साली तो सीटीआरचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनला. त्याच वर्षी त्यानं कंपनीचं नाव बदलून ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ (आयबीएम) असं केलं. १९२९ साली एक अहवाल वॉटसनच्या हाती पडला. त्यात म्हटलं होतं की अमेरिकेत सगळ्या उद्योगधंद्यांत केल्या जाणाऱ्या हिशेबांपैकी फक्त दोन टक्के हिशेब संगणकांच्या साहाय्यानं केले जातात. ते वाचून वॉटसन अवाक् च झाला आणि आपल्या कंपनीला या धंद्यात जम बसवायला किती वाव आहे हेही त्याच्या लक्षात आलं.
वॉटसनच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली आयबीएमनं एका पाठोपाठ एक नवीन उत्पादन काढत सर्वत्र यशाचे झेंडे रोवले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमाराला आयबीएमची वार्षिक उलाढाल अडीच कोटी डॉलर्सच्या घरात गेली होती! बघताबघता वॉटसन अमेरिकेत प्रचंड महत्त्वाची व्यक्ती बनला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नाव झळकायला लागलं. ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या नवनव्या तंत्रज्ञानानं आयबीएमनं अमेरिकेशिवाय इंग्लंड आणि सोव्हिएत रशियाबरोबरच तत्कालिन नाझी राजवटीच्या जर्मनीलाही मदत केली. आयबीएमच्या पंचकार्डस्मुळे जर्मनीत जनगणना करणं आणि त्यांच्या क्रूर अत्याचार-केंद्रांमध्ये त्यांच्या दृष्टीनं ‘अपवित्र’ असलेल्या माणसांना मारून टाकणं हे घृणास्पद काम सोपं झालं! किंबहुना हिटलरच्या नाझी सरकारनं वॉटसनच्या ‘मदतीबद्दल’ त्याला सरकारी पारितोषकही दिलं. पण अर्थातच आपल्या तंत्रज्ञानाचा असा गैरवापर होईल हे वॉटसनला कुठे माहिती होतं?
ज्या एकाधिकारशाहीच्या अवैध मार्गाचा अवलंब केल्याबद्दल वॉटसनला एनसीआरमधून बाहेर पडावं लागलं होतं तेच आरोप आयबीएम आणि रेमिंग्टन यांच्या भागीदारीविषयी १९३६ साली झाले. आपली पंचकार्डाची यंत्रं विकत घेतलेल्या ग्राहकांनी फक्त आयबीएमनं बनवलेली पंचकार्ड्स वापरावीत असा आग्रह आयबीएमनं धरल्याचा हा परिणाम होता. न्यायालयानं आयबीएमवर याबाबत ताशेरे ओढूनही त्या गोष्टीचा प्रत्यक्षात काहीच उपयोग न होण्याचं कारण म्हणजे आयबीएम सोडून फार कुणी या पंचकार्ड्सचं उत्पादनच करत नव्हतं.
३० ऑक्टोबर १९२५ या दिवशी थॉमस वॉटसननं न्यूयॉर्कमध्ये आयबीएमच्या संचालक मंडळाची पहिली बैठक बोलावली. वॉटसननं त्याच्या दृष्टीनं आयबीएमला अतिशय यशस्वी बनवण्यासाठी जी मंडळी महत्त्वाची ठरू शकतील असं वाटलं होतं त्यांना संचालक मंडळावर आणलं होतं. या काळात आयबीएमपुढे असलेली आव्हानं जरा वेगळ्याच स्वरूपाची होती. पूर्वी वॉटसननं मोडकळीला आलेल्या ‘सीटीआर’ कंपनीची सूत्रं हाती घेतली तेव्हा लोक त्यांच्या स्वयंपाकघरात फ्रीज वापरत होते आणि रेल्वेतून स्टेशनवर उतरल्यावर यंत्रात पैसे टाकून सँडविचेस विकत घेत होते. या सगळ्या गोष्टींमधलं नावीन्य संपून आता त्या सगळ्यांच्या दृष्टीनं सहजपणे वापरायच्या गोष्टी झाल्या होत्या. या वेगानं बदलणाऱ्या जगात आपली बेरजा वगैरे करणारी आणि पंचकार्ड्स वापरून चालणारी यंत्रं काय करणार असा विचार वॉटसनच्या मनात घोळत होता. लोक नक्कीच त्यांना जुनाट, चुका करणारी, आवाजानं वैतागून सोडणारी यंत्रं समजणार असं त्याला वाटत होतं.
या वॉटसनच्या बहारदार आयुष्याविषयी आणि कारकीर्दीविषयी आणखी बोलूया पुढच्या वेळी!

No comments: