Thursday, April 30, 2009

अस्मितेची पन्नाशी!

मराठी माणसाने आपल्या उग्र आणि तेजस्वी अस्मितेचे दर्शन घडवून केंद सरकारला मराठी माणसापुढे गुडघे टेकावयास भाग पा
डल्यानंतर १ मे १९६० रोजी स्थापन झालेले मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य आज पन्नाशीत प्रवेश करत आहे. पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या कोणाच्याही भावना, आपले अधेर्अधिक आयुष्य संपत आले, अशा असणे स्वाभाविक असले तरी एखाद्या राज्याच्या वाटचालीत ५० वषेर् हा अगदीच अल्प असा कालावधी मानावा लागेल. त्यामुळेच पुढच्या ५० वर्षांत अधिक दमदारपणे वाटचाल कशी करता येईल, याचाच विचार याप्रसंगी व्हायला हवा. आजवर सरली ती ५० वषेर् महाराष्ट्राने मोठ्या दमदारपणे आणि दिमाखाने पार केली, हे खरे असले तरी त्याचबरोबर या ५० वर्षांत बहुतेक सगळ्याच स्तरांवरील संदर्भ बदलत गेल्याने नवनवी आव्हानेही आपल्यापुढे उभी ठाकली आहेत. योगायोग असा की भविष्यात नेमकी कोणती पावले उचलली जावीत, याचा निर्णय घेण्यासाठी मुंबईकरांनी कालच मतदान केले आहे. मुंबईकर आणि त्याचबरोबर गेल्या पंधरवड्यात मतदान करणारा महाराष्ट्र यांनी नेमका कोणता कौल दिला आहे, याचा उलगडा होण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे. आणखी एक योगायोग असा की पुढच्या काळात महाराष्ट्राचे कारभारी निवडण्यासाठी येत्या सहा महिन्यांतच मराठी माणसाला पुन्हा एकदा मतदान करण्याची संधी मिळणार आहे. पण कालच्या लोकसभा निवडणुकीत मंुबईकरांबरोबरच ठाणेकरांनी केलेल्या मतदानाची जी काही आकडेवारी उपलब्ध झाली आहे, ती बघता या लोकशाही व्यवस्थेकडे जनता पाठ फिरवू पाहत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. हे असे का झाले, याचा शोध घेणे हे नव्या-जुन्या राजकारण्यांपुढील पहिले मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांत आणि मुख्यत: २६।११ रोजी मुंबईवर अवचित झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण्यांविषयी सामान्य जनतेच्या मनात कमालीचा तिरस्कार निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्याचाच परिणाम मतदान कमी होण्यात झाला असावा काय, याचा या राजकारण्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रमुख पक्षांकडे मतदार पाठ फिरवत असताना, राज ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'कडे मात्र तरुणाईचा ओढा असल्याचे दृश्य मुंबई आणि ठाणे परिसरात दिसत होते. भविष्याचा विचार करताना खरे तर 'तरुण' हाच केंदबिंदू मानून विचार व्हायला हवा. पण तसा तो झाला नाही, त्याचीच ही परिणती आहे. 'मराठी अस्मिता' जागृत झाली म्हणूनच महाराष्ट्र राज्य जन्माला आले. पण त्याच अस्मितेचा वापर नंतरच्या काळात तुकड्या-तुकड्यांच्या राजकारणासाठी झाला.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने यशवंतराव चव्हाण यांनी केलेले पहिलेवाहिले भाषण आम्ही शेजारीच प्रसिद्ध केले आहे. 'आपल्यापुढील विविध प्रश्ानंचा विचार करताना आम्ही प्रथम भारताचे नागरिक आहोत आणि नंतर महाराष्ट्रीय!' असा मुद्दा त्यात यशवंतरावांनी मांडला होता. पण त्याकडे बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आणि अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षाचे तर दोन तुकडे झाले. हे असे का घडते, याचाही विचार यावेळी व्हायला हवा. खरे तर या ५० वर्षांत बदलला गेलेला राज्यातील प्रमुख महानगरांचा चेहरामोहरा राज्याच्या विधायक विकासाचा साक्षीदार आहे. औद्योगिकीकरण तसेच अर्थकारण याबरोबरच कला-साहित्य-संस्कृती या क्षेत्रांतही महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकला! यशवंतरावांसारख्या सुसंस्कृत नेत्याने या राज्याची पायाभरणी ठामपणे केल्यामुळेच पुढची पावले उचलणे नंतरच्या राज्यर्कत्यांना सुलभ झाले. पण गेल्या काही वर्षांत मात्र आपण आपली सहिष्णुता हरवून बसत तर चाललो आहोतच; शिवाय जात-धर्माच्या नावावर समाजकारण करू लागलो आहोत. केवळ शहरी भागांच्या विकासाकडे आजवर लक्ष केंदित झाले आणि ग्रामीण तसेच मागास भाग दुर्लक्षित राहिला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दुमदुमले ते, हे राज्य ज्या बळीराजाच्या नावाने चालवण्यात सर्वच पक्ष धन्यता मानतात, त्या बळीराजाच्या आत्महत्यांमुळे. भविष्याचा आराखडा आखताना, या राज्यातील उभरत्या तरुणाईच्या मनात काय खदखदत आहे, याचाही विचार करावा लागणार आहे. राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणारे काही कार्यकतेर् तसेच विचारवंत यांच्या, राज्याच्या पुढच्या ५० वर्षांतील वाटचालीबद्दलच्या भावनांना 'महाराष्ट्र टाइम्स'ने याच अंकात व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्यर्कत्यांनीच नव्हे तर विरोधी पक्षांबरोबरच समाजकारण्यांनीही त्या विचारात घ्याव्या, अशाच आहेत. भविष्याचा विचार करताना, भूतकाळाचे संदर्भ विचारात घ्यावेच लागतात. पण त्याचबरोबर वर्तमानात काय घडत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. 'राकट देशा, कणखर देशा!' असे या राज्याचे वर्णन गोविंदाग्रजांनी हे राज्य अस्तित्वात येण्यापूवीर्च करून ठेवले होते. असे हे रांगड्या माणसांचे मराठमोळे राज्य आज पन्नाशीत प्रवेश करत आहे. पुढच्या वषीर् महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्णमहोत्सव सर्वत्र दिमाखाने साजरा होईल आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नेही रंगवली जातील. पण ती प्रत्यक्षात आणायची असतील, तर त्यासाठी पुढच्या वर्षात गंभीरपणे विचार झाला, तरच 'प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा!' असे आपण अभिमानाने म्हणू शकू.

1 comment:

Anonymous said...

kay bolu ........


really pravin u r too good

u r a too much sensible person.......

nice collection on ur page i like ur

work and presentation about all topics ....