Tuesday, February 24, 2009

माझ्यावर मराठी मातीचे ऋणः गुलजार

' मोरा गोरा रंग लई ले ' असो वा ' मुसाफिर हूं यारो '... ' इस मोड से जाते हं '
असो वा ' तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही '... ' तुझसे नाराज नहीं जिंदगी ' असो वा ' दिल ढुंढता है फिर वही , फुरसत के रातदिन '... ' छोड आये हम वो गलियां ' असो वा ' चुपडी चुपडी चाची '... ' सुनाई देती है जिसकी धडकन ' असो वा ' एकही ख्वाब कई बार देखा है मैने '... प्रत्येक गाणं आजही लोकप्रिय... ; पांढऱ्या कुर्त्याची बाही सावरत , भुऱ्या रंगाचे डोळे अधिक मिचमिचे होतात. गुलजार यांच्या डोळ्यांच्या कडाही आता बोलू लागतात. शब्दांना आठवणींची किनार मिळते आणि गुलजार नॉस्टॅल्जिक झाल्याची चाहूल देणारा खर्जातील आवाज कानावर पडतो. कधी हसरं , खेळकरपणे तो सांगून जातो , तर कधी फुलपाखराच्या पंखांवरचे वेदनेचे रंग अलवारपणे टिपतो. आपलंच आपल्याला सांगतो , म्हणूनच तो बहुधा आवडतो!

लिखाणाची प्रक्रिया उत्स्फूर्त असते... त्या मागील तुमची भूमिका सांगाल का ?

( चष्म्याशी चाळा करत) घड्याळाचा सरकता काटा न मागताही आठवणींच्या पुंजक्याचं दान देतोे. मनाच्या कोपऱ्यात या धूसर गोष्टी जमा होतात. त्या मनाला एक वेगळाच आनंद देतात. मनातले शब्द कागदावर अवतरतात , ते उत्स्फूर्तपणे. सारंच काही मीटरमध्ये बसवता येत नाही. उत्स्फूर्तपणा हा माझ्या कवितेचा गाभा! अगदी ' मोरा गोरा अंग... ' पासून आताच्या ' कजरा रे ' पर्यंत!

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारा माहौल बदलून टाकतो. मनात येणारे विचार हे व्यक्तिसापेक्ष असतात आणि वेगळेपणा हे त्याचं अध्याहृत. हेच तर कवितेचं वेगळेपण! आज या साऱ्या गोष्टींकडे पाहताना काही गोष्टी अस्पष्टपणे जाणवत राहतात आणि म्हणूनच त्या माझ्या कवितांमध्ये डोकावतात. मग ते नात्यांचं तुटलेपण असो वा स्त्री प्रतिमा! यामागील कार्यकारणभाव मात्र नेमके सांगता येणार नाहीत. त्याची चिकित्सा करण्याचा वायफळ प्रयत्नही करणार नाही. या अंधाऱ्या बाजूमुळे एक उत्सुकता कायम आहे आणि ती माझ्या कवितेतून अवतरतेय. ते उलगडून पाहण्याची इच्छा नाही. हे सारं समोरासमोर मांडता येऊ शकेल , पण मला जाणीवपूर्वक तसं करायचं नाहीए. आजपर्यंत माझं जन्मगाव पाहिलेलं नाही , पाहायचंही नाही! जखमांच्या खुणा आहेत. शरीराच्या दुखऱ्या भागावर बोट ठेवल्यावर ते खुपलेपण अनुभवण्यात गंमत असते...हे सगळं असंच काहीसं आहे!

रिमिक्सबद्दल तुम्ही काहीसे नाराज आहात असं ऐकलं ?

( हनुवटीवरून तर्जनी फिरवत गुलजार रिमिक्सवर हल्लाबोल करतात. अर्थात सारं काही सात्त्विक संतापाच्या पातळीवरूनच.) रिमिक्स हे मूळ कलाकृतीला धक्का पोहोचवतं. उद्या उठून अजंठा-एलोराचं रिमिक्स करायचं ठरवाल , तर कसं चालेलं ? असा सवाल करताना काहीसा चिडचिडेपणा जाणवत असतो. काहीतरी क्रिएटिव्ह करा. दुसऱ्याच्या कलाकृतीला विदूप करण्यात काय पॉइण्ट ? रिमिक्सच्या विरोधात आहे , कारण ते माझ्या भूतकाळाशी खेळण्याचा प्रयत्न करतात. माझा भूतकाळ बदलण्याचा हक्क त्यांना कोणी दिला ? ( त्यांचा प्रश्ान् आपल्यालाच अस्वस्थ करतो.)

बंगाली साहित्यकृतींचा तुमच्या कलाकृतींवर खूप प्रभाव आहे...

खूप गोष्टी अल्पजीवी असतात. त्यामधील गंमत अनुभवताना चिरकाल टिकणारं काहीतरी करावं , असं नेहमीच वाटत आलंय. ज्या मुशीत तयार झालो , त्याचा गुण असावा बहुधा! रवीन्दनाथ टागोर आणि बंगाली साहित्याचा आपल्या विचारप्रक्रियेवर प्रभाव आहे. बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीच्या सहवासात राहण्याचं भाग्य लाभलं. हृषिकेश मुखजीर् , बासू चॅटजीर् यांच्या संपर्कात आलो. मग जडणघडणही तशीच होत गेली. आणि हो , लग्न केलं तेही बंगाली मुलीशीच की! (हे सांगताना गुलजार दिलखुलास हसतात.)

अन् मराठीचा ?

ज्या मातीत रुजलो , वाढलो त्या मराठी संस्कृतीचेही माझ्यावर ऋण आहेत. पु. ल. देशपांडेंसारख्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभला. विकास देसाईसोबत त्यांच्याकडे जायचो. गप्पांचा फड रंगायचा. त्यावेळी उत्तम मराठी येत नव्हतं. कोणतातरी विनोद झाल्याचं इतरांच्या चेहऱ्याकडे पाहून कळायचं. मग उगाचंच कसंनुसं उसनं हसायचो. घरी आल्यानंतर विकासला विचारून जोक समजून घ्यायचो आणि आठवून एकटाच हसत बसायचो! मराठीचं हे ऋण मान्य करूनच कुसुमाग्रजांच्या शंभरेक कविता रूपांतरित केल्या आहेत. सामान्य माणसाचं दु:ख असो वा त्याची होणारी कुचंबणा , या ज्येष्ठ कवीने प्रत्येक भावना उत्तम पद्धतीने मांडली आहे. कुसुमाग्रजांच्या या प्रोजेक्टनंतर आता नव्या दमाच्या सौमित्रच्या कविता रूपांतरित करण्याचा मानस आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिलीप पुरुषोत्तम चित्रेंसोबत ' सुफीइझम ' वर काम सुरू आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी-फेबुवारीमध्ये ते रसिकांसमोर आणण्याचा विचार आहे.

बंगाली आणि मऱ्हाटमोळ्या संस्कृतीचा माझ्यावर प्रभाव असला , तरी खायला प्रचंड आवडतात , त्या साऊथ इंडियन डिशेस्. मी अस्सल भारतीय आहे की नाही

तुमच्या शब्दांना खरोखर न्याय कुणी दिला असं वाटतं ?

हेमंतकुमार , सलील चौधरी , सचिनदेव बर्मन अशा एकाहून एक सरस संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण पंचम माझ्या शब्दांना जन्मत: असलेला नाद ओळखून होता. आयुष्याशी जुळलेली सुरांची वीण त्याच्या जाण्याने उसवलीय , असं वाटत राहतं. त्याच्यानंतर विशालसारख्या युवा कलावंताने खूप समाधान दिलं. विशालचं काम मनापासून आवडतं. त्या मुलाच्या कामाकडे बारकाईने बघा , गेल्या काही वर्षांत त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकप्रकारची सच्चाई असते. मनापासून करतो आणि एखादी गोष्ट आवडली नाही तरी तितक्याच मोकळेपणाने विशाल नमूद करतो.

स्वत:च्या प्रोजेक्टसाठी ' रचना आकाराला येणं ' आणि इतरांच्या फिल्मसाठी ' गाणी लिहिणं ' यात काही ' उन्नीस-बीस ' होतं का ?

( मिश्किलसं हसून) एखाद्या चित्रपटाची संहिता माझ्या हातात पडत नाही , तोपर्यंत गाणी लिहिणार नाही , हे अलिखित आहे. स्क्रिप्ट पूर्णत: माहितीय म्हटल्यावर मी त्या प्रोजेक्टचा आपोआप घटक बनलेला असतो. अशावेळी लिहिताना सापत्नभाव डोकावणार कसा ?

' मेरा कुछ सामान ' या नव्याने एकत्रितपणे आलेल्या सीडीजबद्दल काय वाटतं ?

आपलेच शब्द नव्याने भेटतात... त्यावेळी कसा फील येईल. अगदी तस्सं वाटतं! खूप नॉस्टॅल्जिक झालो नाही हेही खरं. यानिमित्ताने बराचसा गुलज्रार गवसेलही... पण तरीही काहीसा उरेलही , असंही फीलिंग येतं... ' सारेगामा ' चा हा उपक्रम स्तुत्य आहे , पण त्या पलीकडे जाऊन उगाच वयस्कर झालोय म्हणून ही सारी जमवाजमव आहे का , असा विचारही घुटमळत राहतो मनात!

कधी-कधी तुम्ही लिहिलेली गाणीही संगीतकार अथवा दिग्दर्शक नाकारतो का ?

दिग्दर्शकाला तो हक्क आहे. त्याच्या पसंतीला उतरेपर्यंत लिहित राहणं माझं कर्तव्य! इतकं साधंसोप्पं गृहितक मी मनाशी बाळगून आहे. याबद्दलचा एक किस्सा सांगतो , ' माचिस ' च्या वेळी विशालने आवर्जून एक गाणं बदलण्यासाठी सांगितलं. तो खरंतर त्याचा पहिलावहिलाच चित्रपट. पण मी गाणं खुशीने बदलून दिलं. आजच्या युवा पिढीकडून बरंच काही शिकण्याजोगं आहे , मग त्यांची टमिर्नॉलॉजी असो वा त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन! मला हे आत्मसात करायला वेळ लागत नाही... आणि का लागावा ? मी अजूनही तरुणच आहे की!

आजच्या ' जनरेशनेक्स्ट ' बद्दल काय वाटतं ?

' जनरेशनेक्स्ट ' खूपच फास्ट आहे आणि मोकळ्या मनाचीही! ही पिढी ग्लोबल आहे. आम्ही मात्र आपल्याच कोशात... गावातील मातीशी असलेलं नातं कुरवाळत बसलोय.

No comments: