Sunday, March 1, 2009

रहमान...

भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात गेल्या ७७ वर्षांत जे प्रचंड काही घडून गेलं, जे अनेक प्रवाह मिसळत आले, जे नवे प्रयोग होऊन गेले, त्या सगळ्याशी असलेली आपली जैविक नाळ तुटू न देता रहमान आणखी एका नव्या सांगीतिक प्रवासाला निघाला आहे. प्रत्येक गीतात नव्या चार-पाच स्वररचनांचा ऐवज लपवणारा हा प्रतिभावान संगीतकार जगातल्या सगळ्या संगीताला आपल्या कवेत घेऊ पाहतो आहे आणि एका नव्या वैश्विक संगीताची उभारणी करतो आहे. काही बाबतीत तर तो मोझार्टपेक्षाही चार पावलं
पुढे गेला आहे!
अल्लारखा रहमान या नावाचा माणूस एखाद्या आयटी कंपनीत सहजपणे खपून गेला असता. ज्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरच व्हायचं होतं आणि जो हुशार होता, (ही त्याची इच्छा होती आणि त्या अर्थानं त्याचं औपचारिक शिक्षणही झालं नाही!) त्याला एखाद्या नामांकित कंपनीत सहजपणे प्रवेश मिळाला असता आणि कालानुक्रमे तो वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलाही असता. सध्याच्या मंदीच्या काळात त्याच्यावर जराशी टांगती तलवारही राहिली असती. पण मग साऱ्या जगाला वैश्विक सुरांशी नातं कसं जोडता आलं असतं? जगाच्या वेगवेगळ्या भागात निर्माण होत असलेल्या संगीताचं, तिथल्या वाद्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावभावनांचं जागतिक फ्युजन कसं झालं असतं. बरं झालं, अल्लारखा रहमान सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला नाही ते! तो ए. आर. रहमान झाला आणि त्यानं या पृथ्वीवरच्या स्वरांच्या नभांगणाला आपल्या पसरदाराचं अंगण करून टाकलं. अनोळख्या जागी खेळायलाही जरासं बुजल्यासारखं होतं. पण हा पठ्ठय़ा त्या अनोळखी अंगणात बालपणापासून खेळत असल्यासारखा लीलया आपल्या करामती दाखवतो आहे आणि तुमच्या-माझ्यासारखे कोटय़वधी लोक त्याच्याकडे दिग्मूढ होऊन पाहात आहेत.
सगळं जग ज्या झपाटय़ानं बदलतं आहे, त्याच झपाटय़ानं आपणही बदलायचं असं ठरवणाऱ्या अनेकांना ते जमत नाही, हे आपण पाहतो. पण रहमान नावाच्या व्यक्तीनं संगीताच्या दुनियेत बदलाचा जो वेग प्रस्थापित केला, तो आश्चर्यकारक म्हणावा असा आहे. तो एकाच वेळी स्थानिक आणि वैश्विक पातळीवर राहू शकतो, हे जसं त्याचं वेगळेपण, तसंच नवआधुनिकतेच्या जमान्यात तो जराही ‘शिळा’ न होण्याची काळजी घेतो, हे त्याचं वैशिष्टय़.
भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात गेल्या ७७ वर्षांत जे प्रचंड काही घडून गेलं, जे अनेक प्रवाह मिसळत आले, जे नवे प्रयोग होऊन गेले, त्या सगळ्याशी असलेली आपली जैविक नाळ तुटू न देता रहमान नावाचा एक संगीतकार आणखी एका नव्या

सांगीतिक प्रवासाला निघाला आहे. तो आज आपल्यात आहे आणि तो आजही तेवढाच ताजातवाना आहे, हे आपलं सगळ्यांचं भाग्य म्हणायला हवं. केवळ त्याला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले, म्हणून हा अभिमान बाळगायचा नाही, तर गेल्या १८ वर्षांत त्यानं जे जे काही केलं आहे, त्याबद्दल त्याला कुर्निसातही करायचा आहे.
‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटातील संगीताबद्दल त्याला मिळालेल्या पुरस्कारांमुळे भारतीय चित्रपट संगीत जगाच्या नकाशावर पोहोचलं. त्याला प्रतिष्ठाही मिळाली आणि त्याचं वेगळेपणही सगळ्यांच्या नजरेत भरलं. चित्रपट संगीत हे एका व्यक्तीच्या प्रतिभेतून साकार होत नाही. तो प्रतिभांचा संगम असतो. त्यात कवी, गायक, वाद्यवादक, तंत्र, रसिक अशा सगळ्यांचा वाटा असतो. प्रत्येकानं आपापलं काम आपापल्या प्रतिभेच्या अत्युच्च पातळीवरून केलं की काय चमत्कार होतो, याचा अनुभव आपण गेल्या ७० वर्षांत अनेकदा घेतला आहे. मग ते सी. रामचंद्र असोत, की शंकर जयकिशन, मदनमोहन असोत की लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी.- एस. डी. बर्मन असोत की नौशाद, रोशन असो की जयदेव.. या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात आपली नाममुद्रा अशी काही स्पष्टपणे कोरून ठेवली आहे, की ती कुणालाच सहजी विसरता येऊ नये. या यादीत कितीतरी जणांची नावं घालण्याचा मोह कुणालाही होईल, एवढी ही नामावळी मोठी आणि संपन्न आहे. पण या सगळ्या पूर्वसुरींच्या खांद्यावर बसून आणखी दूरवरचं जग पाहण्याची रहमानची नजर आपल्या सगळ्यांना अचंबित करायला लावणारी आहे.
एकाच वेळी तमिळ, पंजाबी, उत्तर हिंदुस्तानी, मराठी अशा वेगवेगळ्या प्रांतात असलेल्या लोकसंगीताच्या आणि मुख्य प्रवाहातील संगीताच्या सगळ्या परंपरांचा साधा परिचय करून घ्यायलाच सारं आयुष्य खर्ची पडायचं एकेकाचं. इथं तर रहमाननं या साऱ्या परंपरांचं अप्रतिम कोलाज करता करताच जगाच्या पाठीवर कुठे कुठे सुरू असलेले सारे प्रयोगही आपल्या परिचयाचे करून दिले. ‘रोजा’ या चित्रपटानं पहिल्याच पदार्पणात जगजिंकणाऱ्या या सिकंदरानं नंतर सारी पृथ्वी पादाक्रांत केली आणि तो आता एका अशा मुक्कामी येऊन ठेपला आहे, की तिथपर्यंत पोहोचणंही कुणाला सहजसाध्य होऊ नये. आधीच्या पिढीतल्या आर. डी. नं केलेले पाश्चात्य संगीतातले प्रयोग ही रहमानसाठी पहिली पायरी होती. पण आर. डी. नं अभिजात आणि पाश्चात्य असे दोन प्रवाह वेगवेगळे ठेवले. तो ‘तिसरी मंजिल’ व ‘अमर प्रेम’ अशा दोन वेगळ्या वाटा चोखाळत होता. रहमाननं पदार्पणातच या सगळ्या वाटांची इतकी कलात्मक सरमिसळ केली की ऐकणाऱ्याने चकित व्हावं.
‘रोजा’ रंगीत असला तरी त्याचं संगीत ब्लॅक अँड व्हाईट होतं. तरीही ताजं टवटवीत होतं. त्या पाठोपाठ आलेला ‘बॉम्बे’ असाच चमकदार होता आणि या दोन्ही चित्रपटातली गाणी आजही रहमानच्या कुठल्या ना कुठल्या गाण्यात पुन्हा पुन्हा सापडतात. पण गेल्या १८ वर्षांत तमिळ आणि हिंदी मध्ये किमान दोन हजार गाणी तयार करणाऱ्या या संगीतकारानं प्रत्येक चालीवर आपलं नाव कायमचं कोरून ठेवलं आहे. गाणं कुणी गायलं आहे, यावरून ते लक्षात ठेवायची भारतीयांची रीत रहमाननं बदलून टाकली. लता, आशा, रफी, किशोर यांच्या काळात गाणी त्यांच्या नावानं लक्षात राहायची. रहमाननं मात्र सगळी गाणी फक्त स्वत:च्या नावावर जमा करून टाकली. गाणं रहमानचं आहे अशीच त्याची ओळख होऊ लागली. संगीतातलं हे परिवर्तन वाटतं तितकं छोटं नाही. त्यानं श्रोत्यांना आवाजाचे वेगवेगळे पोत दाखवले. त्या आवाजातून आणि त्याच्याबरोबर चालणाऱ्या वाद्यमेळातून एक नव्या अनुभूतीचा जो साक्षात्कार घडवला तो केवळ असामान्य सांगीतिक प्रतिभेच्या जोरावर. रहमानकडे इंग्लंडमधील ट्रिनिटी कॉलेजमधील शिक्षणाचा म्हणजे पाश्चात्य संगीताच्या शिक्षणाचा अनुभव आहे. पण केवळ त्यामुळे त्याला आपलं संगीत जागतिक पातळीवर नेता आलेलं नाही. संगणकाच्या क्रांतीनंतरच्या काळात आपली प्रतिभा विकसित करणारा हा संगीतकार तंत्रशरण नाही. तंत्रावर विसंबून राहून जे घडेल, त्याला तो सामोरा जात नाही. संगणाकावर संगीतासाठी असलेल्या ‘सॉफ्टसिंथ’ सॉफ्टवेअरचा इतका चपखल आणि कलात्मक वापर करण्यासाठी त्याच्याकडे अनोखी प्रज्ञा आहे. पूर्वी वादक आणि गायक एकाचवेळी गाणं ध्वनिमुद्रित करत असत. आता हजार ट्रॅक्सवर संगीत वेगवेगळं रेकॉर्ड करून ते एकत्र करण्याची सोय आहे. या सगळ्या हजार ट्रॅक्सवर असलेल्या संगीताच्या एकत्रीकरणातून आपल्याला नेमका कोणता इफेक्ट साधायचा आहे, याचं ‘दर्शन’ रहमानला आधीच झालेलं असतं. त्यामुळे तो तालवाद्यांचा स्वरवाद्यांसारखा आणि स्वरवाद्यांवरचा ‘झाला’ तालवाद्यांप्रमाणे वापरतो. जगातील विविध भागांतील वाद्ये एकमेकांना पूरक ठरतील, अशी उपयोगात आणून भारतीय व पाश्चात्य संगीताला सहजपणे तो एकत्र आणतो. दोन भिन्न संगीत परंपरा शेजारी ठेवून फ्युजन होतं, असा आपल्याकडे एक समज आहे. पण जेव्हा या दोन एकमेकांशी फटकून वागणाऱ्या संगीत परंपरा दुधात साखर विरघळावी तशा परस्परांत सहजपणे मिसळतात आणि आपल्या हे लक्षातही येत नाही, तेव्हा त्याचा होणारा परिणाम इतर कोणत्याही संगीतापेक्षा वेगळा असणं स्वाभाविक आहे.
तंत्राचा आणि त्याच्या आधारे मिश्रणाचा इतका कलात्मक वापर त्यानं केला आहे की आजचे सारे संगीतकार त्याला अनुसरणं पसंत करतात. तरीही रहमान तेवढाच ताजा वाटतो आहे, याचं कारण त्यांनं आपली प्रतिभा जराही ताणली नाही. जे सुचतं, ते एखाद्या कारखान्यातील उत्पादन साखळीसारखं बाजारात आणण्याची त्याची तयारी नसते. आपल्या प्रतिभेला फुटणाऱ्या धुमाऱ्यांना काबूत ठेवून त्याचा योग्य वेळी वापर करण्याची प्रचंड क्षमता त्याच्या ठायी आहे. गुरू इलायराजा यांच्यासारख्या असामान्य प्रतिभावनाच्या संगतीत राहणाऱ्या रहमानला काळाची खरी नस सापडली आहे. आधुनिकता, उत्तर-आधुनिकता, नवआधुनिकता असल्या संज्ञांच्या जंजाळात सापडण्याची त्याला गरज वाटत नाही. त्यामुळे तमीळ चित्रपटात दु:खी प्रसंगात वापरलेलं गाणं हिंदूीत येताना जरासे फेरबदल करून आनंदी करण्याचं कसब त्यानं बाणवलं आहे. त्यांच्या गीतांमधील पाश्र्वसंगीत आणि चित्रपटातील पाश्र्वसंगीत ही नेहमीच वेगळी ट्रीट असते. प्रत्येक वाद्याच्या, प्रत्येक सुरात, सुरावटीत आणि त्यांच्या मेळात तपशीलानं लक्ष घालणारा रहमान कलात्मकतेच्या पातळीवर जराशीही चूक होऊ देत नाही. तपशिलात दडलेल्या सौंदर्याची एवढी देखणी जाण फार क्वचित दिसते आणि त्यामुळेच तो सगळ्यांमध्ये उठून दिसतो.
भारतीय राग संगीत जगातल्या इतर संगीतापेक्षा वेगळं आहे, संपन्न आहे, असं सांगत असताना भारतीयांना जगातल्या इतर संगीतात असलेल्या सौंदर्यस्थळांचा आस्वाद देणारा हा संगीतकार ती सौंदर्यस्थळं जेव्हा आपल्याच परंपरेत विरघळून टाकतो, तेव्हा ऐकणाऱ्याचं पाणी - पाणी होईल नाही तर काय? त्याच्या गाण्यातल्या स्वरांची पुकार आणि त्यातून व्यक्त होणारा स्वरभाव यासाठी त्याला हजारदा सलाम करायला हवा. ज्या सूफी संगीताचा त्याच्यावर प्रभाव आहे, त्या सूफी संगीतातील आवाजाची फेक आणि आर्तता, आनंद साजरा करण्याची स्वरपद्धत आणि इतर स्वरांशी असलेला अनुबंध यासाठी रहमान नेमकं काय करतो, याचं उत्तर त्याच्या मेलडी आणि हार्मनीच्या सुमेळात आहे. जगातल्या या दोन्ही परंपरांचं इतकं सुरेख मिश्रण करण्यासाठी असलेली नेमकी प्रतिभा त्याच्याजवळ आहे, म्हणून तर तो ‘वंदे मातरम्’ वेगळ्या पद्धतीनं सादर करू शकतो. न्यूयॉर्क ब्रॉडवेच्या ‘बॉम्बे ड्रीम्स’साठी वेगळ्या संगीताचा विचार करू शकतो. ‘जिया जले जान जले’सारख्या गीतात तमीळ लोकसंगीताचा आणि मोर्सिग या वाद्याचा बेमालूम वापर करू शकतो. ‘छय्याँ छय्याँ’सारखं लोकगीत पाश्चात्य वाद्यमेळात तयार करू शकतो. ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ किंवा ‘पिया हाजी अली’ सारखी परंपरागत स्वररचना नव्या साजात सादर करू शकतो.
उदाहरणे देण्याचा मोह टाळायलाच हवा. कारण तो पुन:प्रत्ययाच्या आनंदाचा भाग असतो. पण प्रत्येक गीतात नव्या चार-पाच स्वररचनांचा ऐवज लपवणारा हा प्रतिभावान संगीतकार जगातल्या सगळ्या संगीताला आपल्या कवेत घेऊ पाहतो आहे आणि एका नव्या वैश्विक संगीताची उभारणी करतो आहे. (काही बाबतीत तर तो मोझार्टपेक्षाही चार पावलं पुढे गेला आहे!) हे संगीत केवळ कालानुरूप नाही, तर ते चिरकाल टिकणारं व्हावं असा प्रयत्न करतो आहे. संगीताची भावी दिशा व्यक्त करतो आहे आणि भारतीयांबरोबरच साऱ्या जगातल्या रसिकांना एका वेगळ्या अपूर्व आनंदाला सामोरं नेतो आहे. हे सगळं आपण याची कानी ऐकतो आहोत, यापरते भाग्य ते कोणते?
‘युरोपियन युनियन’चे पाठबळ
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये वर्चस्व प्राप्त केलेल्या ‘स्लमडॉग मिलिऑनेर’ या ब्रिटिश चित्रपटाला ‘युरोपियन युनियन’च्या ‘फिल्म सपोर्ट प्रोग्राम मीडिया’चे ८ लाख ३० हजार युरोंचे अर्थसहाय्य मिळाले होते. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल युरोपियन युनियनचे मीडिया कमिशनर व्हिवियन रेडिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. युरोपियन युनियनचे अर्थसहाय्य लाभलेले चित्रपट जगभरात प्रदर्शित होतात. त्यामुळे या चित्रपटांना जगभरातील परीक्षकांसमोर पेश होण्याची संधी मिळते. हा निधी योग्य रीतीने वापरल्याचे ‘स्लमडॉग..’ च्या यशाने सिद्ध झाल्याची प्रतिक्रियाही रेडिंग यांनी दिली. यामुळे युरोपीय चित्रपटात सांस्कृतिक विविधता येण्याच्या दृष्टीनेही मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
‘युरोपियन युनियन’च्या ‘मीडिया प्रोग्राम’चे सहकार्य लाभलेल्या अनेक चित्रपटांना यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये नामांकने मिळाली होती. या उपक्रमाअंतर्गत या चित्रपटांना ‘युरोपियन युनियन’चे ३० लाख २८ हजार युरोचे अर्थसहाय्य लाभले होते. ‘युरोपियन युनियन’च्या ‘मीडिया प्रोग्राम’अंतर्गत दृक्श्राव्य क्षेत्राच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यात चित्रपटांचे वितरण, प्रशिक्षण उपक्रम, विविध उत्सव, जाहिरात प्रकल्प आदींचा समावेश असतो.

No comments: